भारताचे विविध प्रदेश आणि राज्य येथील अक्षय्य तृतीया !
१. उत्तर भारत
या प्रांतात या दिवशी पूजा आणि प्रार्थना केल्या जातात. परशुराम जन्मोत्सव साजरा केला जातो. गंगा नदीमध्ये स्नान करणे, तीर्थयात्रा करणे, यज्ञ करणे, तसेच अन्न आणि धन यांचे दान करणे, ब्राह्मणाला सातू आणि समिधा देणे, असे धार्मिक आचार या दिवशी केले जातात. या दिवशी उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात. हे मंदिर अक्षय्य तृतीयेला उघडल्यावर दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी बंद होते. वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात केवळ याच दिवशी श्रीविग्रहाचे (मूर्तीचे) चरणदर्शन होते आणि नंतर पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात. जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो, अशी भारतीय संस्कृतीत धारणा आहे. या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले अशीही आख्यायिका आहे.
२. ओडिसा
या प्रांतात शेतकरीवर्गात या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी श्री लक्ष्मीदेवीची पूजा करून नवीन धान्याची पेरणी केली जाते. या सणाला ‘मुठी चुहाणा’ असे म्हटले जाते. या दिवशी पालेभाज्या आणि मांसाहार यांचे सेवन केले जात नाही. प्रसिद्ध अशा जगन्नाथ रथयात्रेचा प्रारंभ या दिवशी होतो.
३. बंगाल
या प्रदेशातील व्यापारी वर्गात अक्षय्य तृतीया महत्त्वाचा दिवस मानला जातो. ‘हालकटा’ या नावाने या दिवशी गणपतीची आणि लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते.
४. दक्षिण भारत
श्री महाविष्णु आणि श्री लक्ष्मी अन् श्री कुबेर यांच्या पूजनाचे महत्त्व या दिवशी असते. मंदिरात दर्शनाला जाणे, अन्नदान करणे असे आचार या दिवशी केले जातात.
५. महाराष्ट्र
महाराष्ट्रातील कान्हादेशमध्ये (खान्देश) अक्षय्य तृतीयेच्या सणाला ‘आखजी’ म्हणून संबोधले जाते. येथे आखजी हा सण दीपावली एवढाच महत्त्वाचा गणला जातो. सालदार, बलुतेदार अक्षय्य तृतीया या दिवसापासून नवा प्रारंभ करतात.
६. राजस्थान
राजस्थानातही हा दिवस शुभ मुहूर्ताचा समजतात. तेथे या दिवसाला ‘आखा तीज’, असे म्हणतात. राजस्थानातील शहरी आणि ग्रामीण भागांत या दिवशी विवाह करण्याची पद्धती आहे.
(साभार : विकीपिडिया संकेतस्थळ)
अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने करावयाचे काही धार्मिक आणि सांस्कृतिक आचार !१. या दिवशी जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत अथवा समुद्रात अंघोळ करणे. २. सकाळी तांदूळ, मीठ, तूप, साखर, चिंच, फळ आणि वस्त्र यांचे दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणादान करणे. ३. ब्राह्मणभोजन घालणे. या दिवशी सातूचे महत्त्व असून ते खावे. |