हवामान पालटामुळे वर्ष २०३० पासून प्रतिवर्षी करावा लागणार ५६० संकटांचा सामना ! – संयुक्त राष्ट्रे

आग, पूर, दुष्काळ, साथीचे रोग आदींचा धोका वाढणार

नवी देहली – जगभरात वर्ष २०१५ पासून हवामान पालटामुळे प्रतीवर्षी आग, पूर, दुष्काळ, साथीचे आजार आदी विविध ४०० संकटांचा सामना करावा लागत आहे.  हवामान पालटाचा वेग सध्या आहे तसाच राहिला, तर वर्ष २०३० पासून जगभरात प्रतिवर्षी अशा ५६० संकटांचा सामना करावा लागणार आहे. याविषयी संयुक्त राष्ट्रांच्या वैज्ञानिक समितीने एका अहवालात माहिती दिली आहे.

१. या अहवालानुसार हवामान पालट हा हवामानाशी संबंधित संकटांची तीव्रता, गांभीर्य, कालावधी आणि दुष्परिणामांचा स्तर वाढवत आहे. वर्ष १९७० ते २००० या काळात जगभरात प्रतिवर्षी केवळ ९० ते १०० मध्यम आणि मोठी संकटे येत होती; मात्र नंतरच्या काळात यांत वाढ झाली. वर्ष २०३० मध्ये उष्णतेच्या लाटांची संख्या वर्ष २००१ च्या तुलनेत तिपटीने वाढेल आणि दुष्काळांच्या संकटातदेखील ३० टक्क्यांनी वाढ होईल.

२. यावर आताच उपाययोजना केल्या नाहीत, तर हवामान पालटाची स्थिती आणि त्यामुळे येणार्‍या संकटांचे स्वरूप नियंत्रणाबाहेर जाईल. लोकांना ‘आतापर्यंत या संकटांनी किती हानी केली आहे ?’, याची कल्पना नाही. संकटांवर खर्च होणार्‍या निधीपैकी ९० टक्के खर्च आपतकालीन स्थितीसाठी होतो, केवळ ६ टक्के पुनर्निमाण आणि ४ टक्के प्रतिबंधात्मक उपयांवर खर्च होतो.

संपादकीय भूमिका

  • हवामान पालट प्रदूषणामुळे निर्माण झाला असून हे प्रदूषण विज्ञानाच्या अतिरेकामुळे झाले आहे. गेल्या १०० वर्षांत विज्ञानाद्वारे बरीच प्रगती केल्याचे कितीही सांगितले जात असले, तरी ती प्रगती विनाशाला आमंत्रण देत आहे, हेच यातून लक्षात येते !