महाराष्ट्रासह उत्तर आणि मध्य भारतात ५ दिवस उष्णतेची भीषण लाट !
हवामान विभागाची चेतावणी !
नवी देहली – पुढील ५ दिवस महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये उष्णतेची भीषण लाट येणार आहे, अशी चेतावणी हवामान विभागाने दिली. उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतात ही लाट असेल. ईशान्य भारतही या काळात तप्त राहील.
अनेक राज्यांत ४५ अंश सेल्सियसपर्यंत तापमान वाढू शकते !
२८ एप्रिल या दिवशी हवामान विभागाने घोषित केलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील विदर्भ, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब, हरियाणा, देहली आणि राजस्थान या राज्यांत ५ दिवस उष्णतेची लाट राहील. बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, बंगाल आणि तेलंगाणा या राज्यांतही उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. या राज्यांतील अनेक ठिकाणी दिवसाचे तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत वाढू शकते.
काही जिल्ह्यांमध्ये अवेळी पावसाची शक्यता !
पश्चिम महाराष्ट्रात अवेळी पावसाचे सावट असून सांगली आणि सातारा जिल्ह्यांत ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटांसह ३० ते ४० प्रतिघंटा वेगाने वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. वर्धा, चंद्रपूर, अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यांत ‘ऑरेंज अलर्ट’, तर नागपूर जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. (‘ऑरेंज अलर्ट’ म्हणजे नैसर्गिक आपत्तीची चेतावणी, लोकांनी अतीसावध रहाण्याची आवश्यकता. ‘यलो’ अलर्ट म्हणजे हवामानातील पालटाकडे सातत्याने लक्ष ठेवून सावध रहाणे योग्य.)
आगामी काळात जगभर वादळ, अतीवृष्टी आणि दुष्काळ यांचा प्रकोप वाढेल !‘भूमीवरील आणि समुद्राचे तापमान वाढल्याने जगभरात वादळ, अतीवृष्टी अन् दुष्काळ यांचा प्रकोप वाढेल. भूमीचा ओलावा आणि क्षमता अल्प होईल. याचा थेट परिणाम अन्न सुरक्षेवर होईल. हिमनद्या वितळतील. पुराचा धोका निर्माण होईल. पाऊस न झाल्यास दुष्काळ पडेल. अन्न आणि जल संकट निर्माण होईल. हे पालट अत्यंत वेगाने होत आहेत. हवामानातील पालट रोखण्याविना बचावाचा कोणताच मार्ग नाही’, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. |