गोव्यात प्रतिवर्षी १२ किशोरवयीन मुली गर्भवती होतात !

अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाचा समावेश करण्याची वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांची मागणी

प्रतिकात्मक छायाचित्र

पणजी, २९ एप्रिल (वार्ता.) – गोव्यात प्रतिवर्षी १२ किशोरवयीन मुली गर्भवती होत आहेत आणि याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण न केल्यास हा आकडा आगामी काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्रातील, तसेच अशी प्रकरणे हाताळणारे तज्ञ यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाचा अंतर्भाव करण्याची जोरदार मागणी केली आहे. (पाश्चात्त्य देशांतील अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षण दिले जाते; परंतु तेथे अल्पवयीन मुली शारीरिक संबंध ठेवण्यात अग्रेसर आहेत, हे येथे तज्ञांनी लक्षात घेतले पाहिजे ! – संपादक)

सद्यःस्थितीत शाळांमध्ये ‘कुठला स्पर्श योग्य आणि कुठला अयोग्य ?’ या विषयापुरती सिमीत माहिती दिली जाते. याविषयी तज्ञमंडळींनी प्रसारमाध्यमांकडे पुढील सूत्रे मांडली.

१. अनेक किशोरवयीन मुली गर्भवती राहिल्यास त्याविषयी सल्ला घेण्यासाठी आधुनिक वैद्यांकडे न जाता थेट औषधालयांतून गर्भपाताच्या (‘ॲबॉर्शन’च्या) गोळ्या घेतात. ही एक नित्याची गोष्ट आहे.

२. गर्भपाताच्या गोळ्या घेतल्याने अनेक समस्या निर्माण झाल्यानंतर या मुली आधुनिक वैद्यांकडे जातात. वास्तविक गर्भपाताच्या गोळ्या घेण्यासाठी काही नियम आहेत आणि त्याचे पालन केले जात नाही.

३. गर्भपाताच्या गोळ्या किशोरवयातच घेतल्याने मुलींना पुढे आयुष्यात गर्भधारणा न होण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

४. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी शाळेत लैंगिक शिक्षण देणे अनिवार्य आहे. (केवळ गर्भवती रहाणे आणि गर्भपाताच्या गोळ्या घेणे, या समस्यांवर उपाययोजना म्हणून लैंगिक शिक्षण देणे, हा त्यावरील पर्याय घातक ठरू शकतो. त्यामुळे ‘अल्पवयीन मुलींनी विवाहापूर्वी कुणाशीही शारीरिक संबंध ठेवू नयेत’, यावरच उपाययोजना, म्हणजे मूळ कारणावरच उपाययोजना काढणे श्रेयस्कर आहे ! यासाठी मुलींना धर्मशिक्षण देणे महत्त्वाचे आहे ! – संपादक) त्याचप्रमाणे विद्यार्थिनींचे समुपदेशन करणेही आवश्यक आहे.’’

संपादकीय भूमिका

  • छोट्याशा राज्यात गर्भवती मुलींचे वाढते प्रमाण, हा समाजात स्वैराचार वाढल्याचा पुरावा !
  • मुली गर्भवती रहातात म्हणून त्यांना लैंगिक शिक्षण दिले, तर त्यांना ‘शारीरिक संबंध ठेवतांना काय काळजी घ्यायची ?’ हे समजेल आणि अल्पवयीन असतांनाच शारीरिक संबंध ठेवण्याचे प्रमाणही वाढेल. त्यामुळे ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’, असे म्हणण्याची वेळ येईल !
  • लैंगिक शिक्षणाने असे प्रकार खरेच अल्प होतील का ? खरे तर मुलींना नीतीमत्ता शिकवणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यानंतरच्या ७४ वर्षांत धर्मशिक्षण नसल्याने समाजाची नीतीमत्ता किती ढासळली आहे, तेच यातून दिसून येते !