प्रेमळ आणि गुरुदेवांच्या अखंड अनुसंधानात राहून प्रारब्धभोग आनंदाने भोगणारे पू. (डॉ.) नंदकिशोर वेद !

डॉ. नंदकिशोर वेदकाका रुग्णाईत असतांना मला त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. त्या कालावधीत माझ्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये गुरुमाऊलींच्या चरणी अर्पण करत आहे.

कै. पू. (डॉ.) नंदकिशोर वेद

१. पहिल्या भेटीतच आपलेसे करून घेणे

डॉ. नंदकिशोर वेदकाकांना मी रुग्णालयात प्रथमच भेटलो. तेव्हा त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते अल्प बोलायचे. त्यांच्याशी झालेल्या प्रथम भेटीतच मला त्यांच्याविषयी आत्मीयता वाटली. त्यामुळे ‘माझी त्यांच्याशी पुष्कळ दिवसांपासून ओळख आहे’, असे मला वाटले.

श्री. अमित पैलवान

२. प्रेमभाव

काका ‘तुला जेवणाचा डबा मिळाला ना ? तुला डबा मिळण्यात काही अडचण आली नाही ना ?’, अशी माझी विचारपूस करायचे. ते त्यांच्या सेवेत असणाऱ्या साधकांचे नेहमी कौतुक करायचे.

३. वेदकाकांनी चूक लक्षात आणून दिल्यावर कृतज्ञता वाटणे

एरव्ही मला कोणी चुका लक्षात आणून दिल्यावर प्रतिक्रिया यायच्या किंवा केवळ नुसतेच ऐकणे व्हायचे; पण काकांनी चूक लक्षात आणून दिल्यावर मी प्रथमच कृतज्ञता अनुभवली. ‘एकाच वेळी अनेक सेवा आल्या की, त्यांचा प्राधान्यक्रम ठरवणे आवश्यक आहे’, हे काकांनी माझ्या लक्षात आणून दिले.

४. रुग्णाईत असतांनाही वेदकाकांची चुकांविषयीची संवेदनशीलता

काकांनी केवळ माझी चूक लक्षात आणून दिली नाही, तर ‘माझ्या काही चुका लक्षात आल्यास सांगा’, असे त्यांनी मला नम्रतेने सांगितले.

५. गुरुदेवांच्या अनुसंधानात राहून प्रारब्धभोग आनंदाने भोगणे

काकांना कर्करोग, उच्च रक्तदाब आणि मधुमेह या व्याधी होत्या. त्यांच्या रक्तातील ‘साखर’ पडताळण्यासाठी आणि अन्य कारणासाठी त्यांचे प्रत्येक घंट्याला रक्त काढणे, ‘सलाईन’ लावणे अन् रक्त देणे, यांसाठी त्यांना सतत सुया टोचाव्या लागत. त्यामुळे त्यांच्या हात आणि पोट यांवर छिद्रे झाली होती. हे सर्व पाहून माझ्या अंगावर काटा
यायचा; पण काका निर्भय आणि स्थिर होते. ते ‘जैसे गुरुदेव की (ईश्वर की) इच्छा होगी, वैसा होगा ।’, असे म्हणायचे.

६. रुग्णाईत असूनही तोंडवळ्यावर तेज जाणवणे

कर्करोगासारख्या असाध्य व्याधीने जर्जर झालेल्या व्यक्ती मी पाहिल्या होत्या; पण काकांना कर्करोग होऊनही त्यांच्या तोंडवळ्यावर वेगळेच तेज जाणवायचे. त्यांच्या जवळ ५ – ६ दिवस असतांना त्यांना एकदाही कर्करोगामुळे होणाऱ्या त्रासाविषयी बोलतांना मी ऐकले नाही. ते गुरुदेवांच्या अखंड अनुसंधानात असल्याचे जाणवायचे.

७. नामजपादी उपाय करणे

काका या स्थितीतही वेळोवेळी नामजपादी उपाय विचारून घ्यायचे. त्यानुसार नामजप करणे, भ्रमणभाषवर मंत्र आणि स्तोत्र ऐकणे, भावसत्संग ऐकणे इत्यादी उपाय करत होते.

८. प.पू. गुरुदेवांप्रती अपार श्रद्धा अन् कृतज्ञताभाव

काका बोलण्याच्या स्थितीत नसनूही प.पू. गुरुदेवांचा विषय निघाला की, त्यांना ‘किती बोलू आणि किती नको !’, असे व्हायचे. एकदा ते म्हणाले, ‘‘मला दोन्ही मुलीच आहेत; पण गुरुमाऊलीने मला मुलाची उणीव भासू दिली नाही. कदाचित् स्वतःच्या मुलानेही माझी जेवढी सेवा केली नसती, तेवढी साधकांनी माझी सेवा केली.’’ हे सांगतांना गुरुमाऊलींच्या प्रती असलेल्या कृतज्ञताभावाने त्यांचा कंठ दाटून आला. त्यांना भावविभोर झालेले पाहून माझीही तशी अवस्था झाली. वेदकाकांचे ते भावपूर्ण शब्द अजूनही आठवले की, माझी भावजागृती होते.

‘वेदकाकांप्रमाणेच आम्हा सर्व साधकांना कठीण प्रसंगातही व्यष्टी-समष्टी साधनेचे प्रयत्न करण्याची स्फूर्ती मिळो’, हीच गुरुमाऊलींच्या चरणी विनम्र प्रार्थना ! वेदकाकांच्या सेवेची संधी दिल्यामुळे गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

(‘हे लिखाण पू. (डॉ.) नंदकिशोर वेद संतपदी विराजमान होण्यापूर्वीचे असल्याने त्यांना ‘पू.’ असे संबोधले नाही.’ – संकलक)

– श्री. अमित पैलवान, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.४.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक