कोरेगाव भीमा घटनेत माझा कोणत्याही पक्षावर आरोप नाही ! – शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
पू. भिडेगुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर आरोप करणार्या शरद पवारांचे चौकशी आयोगासमोर घुमजाव
पुणे – नगर रस्त्यावर वर्ष २०१८ मध्ये कोरेगाव भीमा येथे घडलेल्या हिंसाचार प्रकरणाच्या पाठीमागे वेगळ्या प्रकारचे वातावरण निर्माण करण्यात समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे पू. संभाजी भिडेगुरुजी असल्याचा आरोप घटना घडल्यापासून आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी जाहीर पत्रकार परिषदेत अनेक वेळा केला होता. एल्गार परिषदेचा कोरेगाव भीमा घटनेशी संबंध नाही, असेही वक्तव्य त्यांनी केले होते; मात्र प्रत्यक्षात सदर हिंसाचाराच्या घटनेची चौकशी करणार्या माजी न्यायमूर्ती जे.एन्. पटेल यांच्या चौकशी आयोगासमोर पवार यांनी अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करत कोरेगाव भीमा येथे एकामागोमाग एक घडलेल्या घटनेविषयी मला वैयक्तिक कोणतेही ज्ञान अथवा माहिती नाही. या घटनेमागे कोणत्याही पक्षाचा ‘अजेंडा’ किंवा उद्देश याविषयी माझे आरोप नसल्याचे स्पष्टीकरण देत स्वत:च्या भूमिकेवरून घुमजाव केले.
आयोगासमोर शरद पवार यांची ५ मे आणि ६ मे या दिवशी साक्ष नोंदवली जाणार आहे. त्यासह ५ ते ११ मे या कालावधीत आय.पी.एस्. अधिकारी संदीप पाखले, विश्वास नांगरे पाटील, सेनगावकर, हक आणि चळवळीतील कार्यकर्ती हर्षाली पोतदार यांचा जबाब आणि उलट तपासणी नोंदवली जाणार आहे.