‘फोन टॅपिंग’ प्रकरणात पोलिसांकडून न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट !
मुंबई – राज्यातील ‘फोन टॅपिंग’ प्रकरणी कुलाबा पोलिसांनी २८ एप्रिल या दिवशी न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांना ‘फोन टॅपिंग’विषयी माहिती होती, तसेच यामागे राजकीय पक्ष असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. आरोपपत्रामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे एकनाथ खडसे यांचाही ‘फोन टॅप’ करण्यात आल्याचे म्हटले आहे. संजय राऊत यांचा ‘संतोष रहाटे’ या नावाने ७ ते १४ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत, तर एकनाथ खडसे हे अमली पदार्थांचा पुरवठादार असल्याचे दाखवून २ मास त्यांचा ‘फोन टॅप’ करण्यात आला असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी रश्मी शुक्ला यांचाही जबाब नोंदवला आहे.