संभाजीनगर येथे १ मे या दिवशी राजसभा होणारच !

अटी आणि शर्ती यांसह मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला संभाजीनगर पोलिसांची अनुमती !

संभाजीनगर – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शहरातील बहुचर्चित सभेचा मार्ग मोकळा झाला आहे. पोलिसांकडून सभेला अनुमती मिळाली असून आता राज ठाकरे यांची मुलुख मैदानी तोफ येथील ऐतिहासिक ‘मराठवाडा  सांस्कृतिक मंडळा’च्या मैदानावर धडाडणार आहे. तत्पूर्वी अनुमती आधीच मनसेकडून या सभेची जोरदार सिद्धता करण्यात आली आहे. पुणे येथे मनसेच्या कोअर कमिटीची २६ एप्रिल या दिवशी बैठक झाली. त्यात येथील सभेच्या नियोजनावर चर्चा झाली. राज यांची येथील सभा आणि अयोध्या दौरा यांविषयी रणनीती ठरवण्यात आली आहे.

पुणे येथून संभाजीनगर येथे येणार !

संभाजीनगर येथे १ मे या दिवशी होणार्‍या सभेसाठी राज ठाकरे पुणे येथून रवाना होतील. त्यानंतर सायंकाळी सभा घेतील. या सभास्थळाची संभाजीनगर पोलिसांनी पहाणी केली असून दुसरीकडे मनसेकडूनही मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या प्रांगणात सिद्धता केली आहे. ३ मे या दिवशी पुणे येथे होणार्‍या महाआरतीच्या संदर्भातही नियोजन करण्यात आले.

राज ठाकरे यांच्या सभेसाठी पोलिसांच्या या अटी…

ध्वनीप्रदूषणाचे नियम पाळावे, १५ सहस्रांहून अधिक लोकांना बोलावू नये, इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत याची दक्षता घ्यावी, १ मे या दिवशी ‘महाराष्ट्रदिन’ असल्याने धर्म, प्रांत, वंश आणि जात यांवरून वक्तव्य करू नये. व्यक्ती किंवा समुदाय यांचा अनादर होणार नाही, याची दक्षता घ्यावी, सभेच्या आधी आणि नंतर वाहनफेरी किंवा मिरवणूक काढता येणार नाही, सभेला येणार्‍या लोकांनी घोषणा
देऊ नयेत, जेणेकरून सामाजिक वातावरण बिघडेल. सामाजिक सलोखा बिघडेल, असे कुठलेही वर्तन करण्यात येऊ नये. यांसह आणखी काही अटी सभेला लागू रहाणार  आहेत. सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन करू नये, वाहनतळाचे नियम पाळावे. पोलिसांनी दिलेल्या मार्गानेच प्रवास करावा. स्वयसेवकांची सूची आणि त्यांचे भ्रमणभाष क्रमांक देण्यात यावे.