नाशिक येथे राज्यातील १९८ शेतकऱ्यांचा २ मे या दिवशी पुरस्काराने गौरव !
नाशिक – उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्यशासनाच्या वतीने प्रतिवर्षी कृषी पुरस्काराने गौरवण्यात येते. २ वर्षांपासून कोरोनामुळे हा पुरस्कार वितरण सोहळा रहित करण्यात आला होता; मात्र आता २ मे या दिवशी येथील ‘महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ’ येथे हा कार्यक्रम होणार असून त्यात १९८ शेतकऱ्यांना गौरवण्यात येणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होईल. त्यात वर्ष २०१७, वर्ष २०१८ आणि वर्ष २०१९ या ३ वर्षांचे पुरस्कार प्रदान करण्यात येतील, अशी माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी २८ एप्रिल या दिवशी दिली. ते पुढे म्हणाले की, कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, तसेच कृषी उत्पादन वाढीसाठी योगदान, कृषी विस्तारात काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था, गट, अधिकारी आणि कर्मचारी यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न, वसंतराव नाईक कृषीभूषण, जिजामाता कृषीभूषण, कृषीभूषण (सेंद्रिय शेती), उद्यान पंडित, वसंतराव नाईक शेतीमित्र, पीक स्पर्धा विजेते आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येईल.