ऑस्ट्रिया येथील इतिहासकार आणि राजकारणी डॉ. नास्को यांची एस्.एस्.आर्.एफ.’चे सद्गुरु सिरियाक वाले यांच्याशी झालेली भेट !
गेल्या काही मासांपासून ‘एस्.एस्.आर्.एफ.’चे सद्गुरु सिरियाक वाले युरोपमध्ये अध्यात्मप्रसारानिमित्त दौरा करत आहेत. ऑगस्ट २०२० मध्ये त्यांची ऑस्ट्रिया येथील लोकप्रिय नेते डॉ. नास्को यांच्याशी भेट झाली.
१. डॉ. नास्को यांचा परिचय
डॉ. प्रा. हॉफ्रॅट सिगफ्रिड नास्को (वय ७७ वर्षे) हे मूळचे ग्राझ (ऑस्ट्रिया) येथील आहेत. डॉ. नास्को इतिहासकार आणि राजकारणी असून ते ३० वर्षांपेक्षा अधिक काळ राजकारणात आहेत. काही वर्षे ते सेंट पोल्टन येथील पालिकेचे सभापती होते. वर्ष १९८० पासून ते महानगरपालिकेचे सदस्य बनले. वर्ष १९९० मध्ये त्यांची निवड येथील शैक्षणिक आणि सांस्कृतिक समितीवर झाली. वर्ष २००३ ते २००५ या कालावधीत ते ऑस्ट्रियन संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे सदस्य होते.
डॉ. नास्को यांनी ऑस्ट्रियाच्या इतिहासावर अनेक पुस्तके लिहिली आहेत. ‘इन सर्च ऑफ बाबाजी’ हे त्यांनी लिहिलेले शेवटचे पुस्तक असून त्यात त्यांनी स्वतःच्या साधनाप्रवासाविषयी सांगितले आहे. त्यांच्या या पुस्तकात विविध आध्यात्मिक वचने, अनुभूती आणि राजकीय घटना यांचाही उल्लेख आहे. ऑस्ट्रिया शासनाने पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
२. डॉ. नास्को यांचा साधनाप्रवास
२ अ. ‘राग येणे’ या स्वभावदोषावर मात करता येण्यासाठी ‘क्रियायोग’ या साधनामार्गाने साधना करायचे ठरवणे : डॉ. नास्को यांनी ‘क्रियायोग’ या साधनामार्गाने साधनेला आरंभ केला. पूर्वी त्यांच्यामध्ये ‘राग येणे’ हा स्वभावदोष तीव्र होता आणि या स्वभावदोषाविषयी इतर लोकही त्यांना सांगत असत. ‘या स्वभावदोषावर मात करता यावी’, या उद्देशाने त्यांनी या साधनामार्गाने साधना करायचे ठरवले.
२ आ. गेली ३० वर्षे डॉ. नास्को ध्यानधारणा करत आहेत.
२ इ. विविध साधनामार्गांचा अभ्यास करून त्यानुसार साधना करणे आणि विविध अनुभूती येणे : गेली कित्येक वर्षे त्यांनी विविध साधनामार्गांचा अभ्यास करून त्यानुसार साधना करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी भारत आणि तिबेट येथील कित्येक गुरु अन् साधक यांच्या भेटी घेतल्या आहेत. त्या कालावधीत त्यांना पुष्कळ अनुभूतीही आल्या आहेत. डॉ. नास्को यांना आलेल्या विविध अनुभूतींमध्ये ‘स्वामी प्रेमानंद यांनी सूक्ष्मातून मार्गदर्शन करणे, हवेत हात फिरवून माळा आणि विभूती निर्माण करणे’, यांसारख्या काही अनुभूती आहेत.
२ ई. ‘स्वामी विवेकानंद यांच्या तत्त्वज्ञानावर आधारित योगासने आणि योगपद्धती, हठयोग, ध्यानधारणेचे विविध प्रकार’, यांचाही त्यांनी सखोल अभ्यास केला आहे.
२ उ. सुमारे १० वर्षे ते एका गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना करत होते; पण ‘त्यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक प्रगती होत नाही’, हे लक्षात आल्यावर त्यांनी त्यांच्याकडे जाणे थांबवले.
२ ऊ. एखाद्या विशिष्ट मार्गाने साधना करणाऱ्या साधकांची प्रगती थांबलेली असल्याचे लक्षात आल्यास त्या मार्गाने साधना करणे थांबवणे : एखाद्या विशिष्ट मार्गाने साधना करणाऱ्या साधकांना भेटून ते त्यांना ‘किती वर्षे साधना करत आहात ?’, हा प्रश्न विचारत. त्या वेळी त्यांना ‘१०, १५ वा २० वर्षे’, असे उत्तर मिळत असे. काही वेळा या साधकांमध्ये ‘राग येणे, द्वेष करणे’, असे स्वभावदोष दिसल्यास अथवा ‘त्यांची आध्यात्मिक प्रगती थांबलेली आहे’, असे लक्षात आल्यास ‘हा मार्ग स्वतःच्या प्रगतीसाठी योग्य नाही’, असा विचार करून ते त्या मार्गाने साधना करणे सोडून देत असत.
३. डॉ. नास्को यांची सद्गुरु सिरियाक वाले यांच्याशी झालेली भेट
३ अ. डॉ. नास्को यांनी चांगले आणि समाजातील भोंदू गुरूंच्या संदर्भात आलेले वाईट अनुभव सांगणे, आरंभी ठामपणे बोलणे अन् नंतर त्यात पालट होऊन मोकळेपणाने बोलणे : ६ आणि ११.८.२०२० या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या स्थानिक सत्संगांत डॉ. नास्को यांची सद्गुरु सिरियाक वाले यांच्याशी भेट झाली. त्या वेळी त्यांनी सद्गुरु सिरियाकदादांना चांगले आणि समाजातील भोंदू गुरूंच्या संदर्भात आलेले वाईट अनुभव सांगितले. आरंभी ते सद्गुरु दादांविषयी साशंक होते, तसेच स्वतःची मते तीव्रतेने आणि ठामपणे मांडत होते; पण हळूहळू त्यांच्यात पालट झाला आणि ते मोकळेपणाने बोलू लागले.
३ आ. आपल्याभोवतालचे वाईट शक्तीचे आवरण दूर होऊन ईश्वराचा आशीर्वाद मिळण्यासाठी नामजप करणे आवश्यक असल्याने सद्गुरु सिरियाक वाले यांनी सांगणे : एकदा सत्संगात डॉ. नास्को यांनी सद्गुरु दादांना ‘तुमचा आशीर्वाद मिळावा’, अशी इच्छा आहे’, असे सांगितले. त्यांचे ते वाक्य ऐकून वाटत होते, ‘जणू ते सद्गुरु दादांची परीक्षा घेत आहेत.’ त्या वेळी तेथील आकाश निळे होते आणि सूर्यावर ढग आले होते. वातावरणातील या पालटाचे उदाहरण देऊन सद्गुरु दादा त्यांना म्हणाले, ‘‘जेव्हा सूर्यावर ढगांचे आच्छादन येते, तेव्हा सूर्याचे किरण आपल्यापर्यंत पोचू शकत नाहीत. त्याचप्रमाणे जोपर्यंत आपल्याभोवती वाईट शक्तीचे आवरण असते, तोपर्यंत आपल्याला ईश्वराचा आशीर्वाद मिळू शकत नाही. आवरण दूर झाले की, ईश्वराचा आशीर्वाद मिळतो. त्यासाठी नामजपादी साधना करायला हवी. आपण करत असलेला नामजपच आपली काळजी घेतो.’’ एवढे सांगून सद्गुरु दादांनी त्यांना नामजपाविषयी अधिक माहिती दिली.
३ इ. डॉ. नास्को यांच्याशी बोलतांना सद्गुरु सिरियाक वाले यांना आलेली अनुभूती : हे सांगत असताना सद्गुरु दादांना तेथे परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवून पुष्कळ आनंद मिळत होता. हा सत्संग चालू असेपर्यंत मध्ये मध्ये सद्गुरु दादांना अशी अनुभूती येत होती.
३ ई. वरील सत्संगाच्या वेळी साधिकेला आलेली अनुभूती
१. ‘सद्गुरु दादा डॉ. नास्को यांना नामजपाविषयी सांगत असतांना ‘त्यांच्याकडून डॉ. नास्को यांच्याकडे पुष्कळ प्रीती प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले. सर्व वातावरण चैतन्य आणि प्रीती यांनी भरून गेले होते.
२. त्या वेळी मला आतून पुष्कळ शांत वाटत होते.
३. डॉ. नास्को यांच्याकडे पाहून ‘सद्गुरु दादांचे बोलणे त्यांच्या अंतर्मनापर्यंत जात आहे’, असे मला वाटले.’
– सौ. गेर्लिंडे दोम्ब्रोव्हस्की, ऑस्ट्रिया
४. डॉ. नास्को यांनी मनातील शंकांचे निरसन करून घेणे
११.८.२०२० या दिवशी आयोजित केलेल्या दुसऱ्या सत्संगालाही डॉ. नास्को उपस्थित होते. या सत्संगात त्यांनी विविध प्रश्न विचारून स्वतःच्या मनातील शंकांचे निरसन करून घेतले आणि सत्संगातून पुष्कळ आनंद मिळाल्याचे सांगितले.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले, ‘आपण जगभरातील सर्व साधकांची काळजी घेत आहात, तसेच आपल्या कृपेने आम्हाला सद्गुरु सिरियाकदादांच्या माध्यमातून साधनेविषयीचे मार्गदर्शन आणि चैतन्य मिळत आहे’, याबद्दल आम्ही आपल्या चरणी कृतज्ञ आहोत.’
– युरोप येथील ‘एस्.एस्.आर्.एफ.’चे साधक (सप्टेंबर २०२०)
डॉ. नास्को यांनी सद्गुरु सिरियाक वाले यांचा गौरव करणारा संदेश आणि पत्र पाठवणेसत्संग संपल्यावर घरी जाण्यापूर्वी डॉ. नास्को यांनी सत्संगाच्या आयोजकांचे सुंदर शब्दांत कौतुक केले आणि काही वेळाने पुढील संदेश लिहून पाठवला, ‘आजच्या सत्संगाला उपस्थित राहिल्यामुळे माझ्या साधनेला गती मिळाली आहे. ‘सद्गुरु सिरियाक वाले अलौकिक आहेत’, असे मला वाटते.’ – सौ. गेर्लिंडे |
१९.९.२०२० या दिवशी डॉ. प्रा. हॉफ्रॅट सिगफ्रिड नास्को यांनी ई-मेलने पाठवलेले पत्रप्रिय गेर्लिंडे, मी तुझा आणि श्री. राफेल (सौ. गेर्लिंड यांचे पती) यांचा अत्यंत आभारी आहे. तुमच्यामुळे माझी सद्गुरु सिरियाक यांच्याशी भेट होऊ शकली. हृदयविकाराचा झटका येऊन गेल्यापासून गेली ५ वर्षे मला श्वास घ्यायला त्रास होत आहे. त्यामुळे मला प्रत्येक पाऊल टाकतांना पुष्कळ त्रास होतो. या सत्संगाच्या वेळी मी रक्तवाहिन्या स्वच्छ करणारे माझे औषध ‘ऑनलाईन’ मागवले होते. अल्पावधीतच माझा हा गंभीर त्रास उणावला. मी विश्रांती न घेता घराच्या पहिल्या मजल्यावर जाऊ लागलो. त्यामुळे ‘मी यापूर्वी मागवलेल्या औषधाने मला लाभ झाला असेल’, असा विचार करून मी ते पुन्हा मागवले. आज मी माझ्या काही मित्रांवर ‘टाँग लेन’ या पद्धतीने उपचार केले. तेव्हा मला आतून जाणवले, ‘गोव्याहून आलेल्या पवित्र पाहुण्याच्या (सद्गुरु सिरियाक यांच्या) दृष्टीक्षेपाने हा आजार उणावण्याचा चमत्कार घडला आहे.’ मी माझा साधनामार्ग पालटू शकत नाही; मात्र तुमच्या या अत्यंत सात्त्विक पाहुण्याशी (सद्गुरु सिरियाक यांच्याशी) मी अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करीन. साधनेच्या प्रत्येक टप्प्यावर मी त्यांचा आदर्श ठेवीन आणि त्यांच्याप्रती कृतज्ञ राहीन. हा अद्भुत चमत्कार केवळ सद्गुरु सिरियाक आणि तुमच्यामुळे घडून आला. शुभेच्छा ! – सिगफ्रिड |
|