रत्नागिरीत ‘अजान’चा आवाज होणार न्यून
आवाजावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा सर्व मशिदींवर लावण्याचा निर्णय
रत्नागिरी – येथील मुसलमानांनी अत्याधुनिक ध्वनीक्षेपक यंत्रणेचा (साऊंड सिस्टीमचा) वापर करून अजान देण्याच्या आवाजावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा सर्व मशिदींमध्ये लावण्याचा निर्णय घेतला आहे. २७ एप्रिल या दिवशी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत हा निर्णय घोषित करण्यात आला.
३ मे या दिवशी अक्षय्य तृतीया आणि रमझान ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या सदस्यांना आवाहन करतांना पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग म्हणाले, ‘‘रत्नागिरी जिल्ह्यात सर्वधर्मीय लोक एकोप्याने रहातात. त्यांच्यातील हा सलोखा कायम रहावा. शेकडो वर्षांची ही परंपरा कायम ठेवत सर्वांनी उत्साहात सण साजरे करावेत.’’
येथील मुसलमानांनी भोंग्यांचा आवाज मर्यादित ठेवणारी ‘आहुजा’ आस्थापनाची अत्याधुनिक यंत्रणा सर्व मशिदींवर लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पहाटेच्या सुमारास अल्प वेळात, तसेच कमी आवाजात अजान दिली जाणार आहे, तर इतर वेळीसुद्धा मर्यादित आवाजात अजान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची कार्यवाही थोड्याच दिवसांत होणार आहे.