राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना अनावृत्त पत्र
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ब्राह्मण समाजावर केलेल्या टीकेचा अनावृत्त पत्राच्या माध्यमातून एका धर्मप्रेमींनी केलेला प्रतिवाद !
आदरणीय भुजबळसाहेब,
नमस्कार,
आपण आमचे पालकमंत्री आहात; म्हणून ‘आदरणीय’ म्हणालो. आपण कोल्हापूर येथील सार्वजनिक सभेत जे काही बोलला, त्याचा प्रतिवाद करणार नाही. आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की, आपण म्हणाला होता, त्याप्रमाणे ‘मंदिरात ब्राह्मणांचेच १०० टक्के आरक्षण का ?’ मंदिरात केवळ ब्राह्मणच पूजा करत नाहीत, तर महाराष्ट्रात श्री क्षेत्र माहूर येथे भोपी, कैकाडी समाजातील त्यांचेच पुरोहित किंवा तुळजापूरमधील श्री भवानीमातेच्या मंदिरात मराठा समाजातील पुजारी, जेजुरीतील मंदिरात त्या त्या समाजातील पुजारी, श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या मंदिरात पुजारी हे ओबीसी समाजातील गुरव, आदिवासीतील देवऋषी, भटक्या विमुक्त समाजातील नामजोशी, नंदीबैलवाले जोशी, पोपटवाले जोशी, कंदिलवाले जोशी, सुवर्णकार समाजातील दैवज्ञ सुवर्णकार असे सगळेच पूजा करतात. आता सांगा आरक्षण कुठे आहे ? मंदिरांमध्ये कुठल्या ब्राह्मणाने अडवले आहे.
१. सर्व जातीच्या मुलांना पूजाविधी शिकवण्यात येणे
गंगापूर, नाशिक येथील श्री बालाजी मंदिर येथे गेल्या १० वर्षांपासून ‘पूजा प्रशिक्षण वर्ग’ चालतो. श्रीक्षेत्र पैठण, श्रीक्षेत्र सज्जनगड (सातारा), कोल्हापूर येथील श्रीक्षेत्र कणेरी मठ येथे आजपर्यंत ७५० ते ८०० विद्यार्थ्यांनी पूजा प्रशिक्षण घेतले आहे. ती मुले ढोर, मातंग, मोची, लमाण, पारधी, फासे पारधी, कैकाडी, लिंगायत, हिंदु कोकणा, आदिवासी, आगरी अशा अनेक समाजातील असून ती विद्यार्जन करून गेली आहेत. त्यांना शिकवणारे ब्राह्मणच आहेत. आता सांगा आरक्षण कुठे आहे ?
परम आदरणीय प.पू. स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज यांच्या प्रयत्नांतून, तसेच प्रसिद्ध उद्योजक श्री. किसनलालजी सारडा यांच्या प्रयत्नांतून समाजातील सर्व जातींसाठी अणि सर्व स्त्री-पुरुष यांच्यासाठी वेदविद्या शिकवण्यात येते. रत्नागिरीमध्येही अशी पाठशाळा आहे.
२. महाराष्ट्रामध्ये विविध जातींचे संत होणे
संत समाजात ब्राह्मणांसह इतरही समाजातील सर्व संत आहेत. सद्गुरु जनार्दनस्वामी, त्यांचे शिष्य संत माधवगिरीजी, संतोषगिरीजी, वेरुळच्या आश्रमाचे पू. शांतीगिरीजी, दिंडोरीचे स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख प.पू. अण्णासाहेब मोरे, आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत सागरानंद महाराज, सोमेश्वरानंद महाराज, फरशीवाले बाबा इतकेच काय, महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज अशी कितीतरी नावे सहज उपलब्ध आहेत. हे सगळेच आदरणीय आहेत, म्हणजे येथेही आरक्षण नाही ! आता सांगा, आपला त्रागा कशासाठी ?
धर्म किंवा व्यवसाय याचा शास्त्रार्थ करण्यासाठी किमान काही पातळीवरचे अध्ययन असावे लागते. ते माझ्याकडे नाही; म्हणून त्यावर माझी माघार आहे. जसे आपण ब्राह्मणांना टोचले, तसे यापैकी एखाद्याच संतांना आपला स्पर्श का करून पहात नाहीत ? एकदा पहा तर खरे !
३. पौरोहित्य शिकण्यासाठी भुजबळ यांना प्रस्ताव !
आपणास पौरोहित्य शिकायचे असल्यास आपण अवश्य यावे किंवा आपण सांगाल, त्या विद्यार्थ्यांकडून आम्ही अभ्यास करून घेऊ. केवळ शिष्य या नात्याने अंगी नम्रता आणि व्रत नियमाचे पालन करावे, ही अपेक्षा ! कोणतेही ‘मूल्य’ आकारणार नाही; कारण ‘मूल्य’ घेऊन शिकवण्याची तशी पद्धतच नाही ! पहिली सत्यनारायणाची पूजा आदरणीय शरद पवार किंवा जितेंद्र आव्हाड यांच्याकडे करूया.
‘…समर्पयामि ।’ सारखी चूक कुणी काढणार नाही, याची काळजी आपण घेऊया ! कृपया मी कोणताच राग किंवा द्वेषभाव मनात न ठेवता (तसे माझ्यात धाडस किंवा धैर्यही नाही !) आपल्या मनातील शल्य दूर होऊन हिंदु समाजात एकी व्हावी, यासाठी आपल्यापुढे प्रस्ताव ठेवत आहे.
ता. क. : साहेब, मी पुष्कळ घाबरलो आहे. आपले समर्थक मला किंवा माझ्या परिवाराला त्रास तर देणार नाहीत ना ? काही चुकले आहे, असे वाटल्यास क्षमाप्रार्थी !
– श्री. मुकुंद खोचे
(साभार : सामाजिक संकेतस्थळ)