रेल्वेतील कुचकामी सुरक्षाव्यवस्था !
काही दिवसांपूर्वी संभाजीनगर जिल्ह्यातील पोटूळ येथे रेल्वेचा सिग्नल कापडाने झाकून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्सप्रेसमधील प्रवाशांना दरोडेखोरांनी लुटले. आतापर्यंत असे दरोडे ३ वेळा पडले असून पोलिसांना अजूनही गुन्हेगार सापडलेले नाहीत, हे आश्चर्यचकित करणारे आहे. यातून पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रेल्वेत रात्रीच्या वेळी तरुण शस्त्रधारी पोलिसांची नियुक्ती करण्याऐवजी लोहमार्ग पोलीसदलाने सेवानिवृत्तीला आलेले पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी नियुक्त केले होते. रात्रीच्या वेळी तरुण शस्त्रधारी पोलिसांची नियुक्ती का केली जात नाही ? तरुणांमध्ये असणारे धाडस आणि शारीरिक क्षमता तुलनेने वयस्करांमध्ये अल्प होत जाते, हे वरिष्ठांनी लक्षात घ्यायला हवे. ‘केवळ दाखवण्यासाठी पोलिसांची नियुक्ती केली आहे’, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
नांदेड ते मनमाड मार्गावर अनेक ठिकाणी प्रतिदिन लूटमार होते; मात्र पोलिसांच्या अन्वेषणाची कटकट नको; म्हणून बहुतांश प्रकरणांत प्रवासी तक्रार प्रविष्ट करत नाहीत, हे अतिशय गंभीर आहे. यामुळे गुन्हेगार शिरजोर होत आहेत. प्रवाशांनी तक्रार प्रविष्ट करायला पोलीस ठाण्यात न जाण्यामध्ये प्रवाशांचा पोलिसांवरील अविश्वास, पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पोलिसांची असहकार्याची भूमिका, पोलीस ठाण्यात वारंवार जावे लागणे, अशी अनेक कारणे आहेत. संभाजीनगरमधील १ सहस्र ७०० किलोमीटरच्या लोहमार्गाचे दायित्व लोहमार्ग पोलिसांकडे आहे. ४५० अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर १० रेल्वेस्थानकांचे दायित्व आहे. ७५ किमी पट्ट्याच्या संभाजीनगर-नगरसोल मार्गावर रेल्वे पोलिसांची केवळ एक चौकी आहे. अशी स्थिती राज्यातील अनेक रेल्वे पोलीस ठाण्यांत असल्यामुळे सुरक्षेअभावी दरोडेखोर हात धुऊन घेत आहेत.
सर्व रेल्वेस्थानकांवर पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त असणे आवश्यक आहे. पोलिसांची रिक्त पदे त्वरित भरली पाहिजेत. तक्रार केल्यानंतर गुन्हेगाराला शोधणे पोलिसांचे दायित्व आहे. त्यामुळे पोलिसांनी तक्रार करणाऱ्याला त्रास होणार नाही, याकडे लक्ष द्यावे. रेल्वे विभागाने उत्पन्न वाढीसह रेल्वेच्या सुरक्षाव्यवस्थेकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. ‘भारतीय रेल्वे सर्वांची जीवनवाहिनी आहे’, या बोधवाक्याला रेल्वे प्रशासनाने खरे उतरावे, हीच प्रवाशांची अपेक्षा !
– श्री. सचिन कौलकर, मुंबई.