आदर्श उद्योगरत्न !
उद्योगपती रतन टाटा हे नाव देश-विदेशात सर्वश्रुत आहे. ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित असणारी जागतिक यशाच्या शिखरावरील महत्त्वपूर्ण व्यक्ती ! रतन टाटा यांनी कोरोना महामारीच्या काळात ‘पीएम् केअर फंड’ला सुमारे दीड सहस्र कोटी रुपयांचे साहाय्य केले होते. ‘आता आयुष्यातील शेवटची वर्षे आरोग्य क्षेत्रासाठी समर्पित करणार आहे’, असा उदात्त विचार त्यांनी नुकताच व्यक्त केला. आसाममधील दिब्रूगड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कर्करोग उपचार केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी पंतप्रधानांच्या समक्षच ही घोषणा केली. टाटा यांचे सध्याचे वय ८४ वर्षे आहे. त्यामुळे साहजिकच त्यांचे शरीर थकलेले होते, बोलतांना आवाजही थरथरत होता; पण अशा स्थितीतही आयुष्याच्या पुढील वर्षांचे नियोजन करून, तसे ध्येय बाळगून टाटा यांनी स्वतःची दुर्दम्य इच्छाशक्तीच सर्वांना दर्शवली. खरे पहाता वयाच्या ८४ व्या वर्षी एखाद्या क्षेत्रासाठी कार्य करण्याचा विचार करणे अशक्यच असते. शरिराचे सर्व अवयव गलितगात्र झालेले असतांनाही आरोग्य क्षेत्रात कार्य करण्याचा निश्चय व्यक्त करून टाटा यांनी समाजासमोर स्वतःचा आदर्शच निर्माण केला आहे. रतन टाटा यांच्या माध्यमातून आसाममध्ये १७ कर्करोग उपचार केंद्रांचे जाळे सिद्ध करण्यात येत आहे. या रुग्णालयांमधून देशभरातील जवळजवळ ५० सहस्र रुग्णांना सुलभ उपचार मिळणार असल्याने आसाम हे ‘जागतिक दर्जाचे कर्करोगावरील उपचार देणारे सक्षम राज्य’ म्हणून ओळखले जाईल. त्यांच्यातील दानशूरता आणि त्यागी वृत्ती भारतियांना शिकण्यासारखी आहे.
यशस्वीतेची निरलस वाटचाल !
वयाच्या ८४ व्या वर्षीही कार्यकुशलतेविषयी व्यक्त होणारे रतन टाटा यांचा उत्साह तरुणांना लाजवणाराच ठरेल. त्यांच्या लहानपणी त्यांचे आई-वडील विभक्त झाले; पण त्यांनी त्यातून खचून न जाता जीवनाची वाटचाल यशस्वीतेच्या दिशेनेच केली. उद्योगपती जमशेदजी टाटा यांचा नातू म्हणून स्वतःची ओळख असतांनाही ती न दाखवता स्वबळावर त्यांनी शिक्षण पूर्ण केले. अमेरिकेत रहात असतांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने त्यांनी बशा विसळण्याचेही काम केले. उद्योगक्षेत्रात पाऊल टाकल्यावर त्यांना अनेकदा प्रतिकूल परिस्थितींचा सामना करावा लागला. यात अपयशही पदरी आले; पण त्यात वहावत न जाता अनुभवांच्या शाळेनेच जणू त्यांना शिकवले असावे. मन खंबीर ठेवून सकारात्मक दिशेने वाटचाल करत हळूहळू ते यशस्वी उद्योगपती झाले. यशस्वीतेचा टेंभा न मिरवता सतत कार्यमग्न रहाणे, हे मोठ्या मनाचेच लक्षण आहे. प्रसिद्धीझोतात येऊनही यशात बुडून न जाता निरलसपणे कार्य करणाऱ्यांपैकीच एक म्हणजे रतन टाटा असावेत, हे निश्चित ! रतन टाटा नेहमी म्हणतात, ‘‘मी प्रथम भारतीय आहे, मग पारशी आहे’; ‘१०० हातांनी धनसंचय करावा; परंतु ते धन सहस्रो हातांनी समाजासाठी वितरित करावे, ही आपली संस्कृती आहे. आपण समाजाचे देणे लागतो, ही भावना महत्त्वाची आहे.’’ असा समाजहिताचा आणि राष्ट्रहिताचा विचार किती जणांमध्ये आहे ? अतिशय साधेपणाने माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या रतन टाटा यांच्यासारख्या व्यक्तींमुळेच आज भारत देश समृद्ध आहे. रतन टाटा यांची ख्याती सर्वदूर असतांनाही मध्यंतरी त्यांच्या नावाचा अपवापर करून एक वादग्रस्त विधान पसरवण्यात आले. त्यात दिले होते, ‘‘इन्स्टाग्राम’वर रतन टाटा यांनी म्हटले, ‘‘आधारकार्डच्या माध्यमातून मद्यविक्री व्हायला हवी.’’ ‘प्रत्यक्षात मी अशा स्वरूपाचे कोणतेही वक्तव्य केलेले नव्हते’, असे सांगत त्यांनी सत्य उघड केले. रतन टाटा यांच्या नावाला आजवर कोणताही बट्टा लागलेला नाही. त्यांनी कधीच त्यांच्या नीतीमूल्यांशी तडजोड केलेली नाही. तरीही समाजातील काही लोक असा खोडसाळपणा करतात, हे संतापजनक आहे. टाटा यांची निंदानालस्ती करण्यापेक्षा त्यांचा आदर्श घेऊन जीवन जगायला हवे.
चतुःसूत्री अंगीकारा !
उद्योग असो किंवा विकासाची अन्य क्षेत्रे असोत, आज सर्वत्र स्वार्थी, मतलबी वृत्तीचे लोक आहेत. चंदेरी आणि झगमगाटाच्या जगात वावरतांना एखाद्या यशस्वी व्यक्तीला डोक्यावर घेतले जाते. त्यामुळे ‘मी म्हणजेच सर्वस्व’ अशी भावना संबंधितांमध्ये निर्माण होते. भुलवणारे यश, तसेच प्रसिद्धीची धुंदी हळूहळू ओसरू लागते. हे मात्र पचवणे कठीण जाते. काही काळाने ती व्यक्ती कधी खाली आपटते, नव्हे नव्हे, तिला कधी खाली पाडले जाते, ते तिचे तिलाही कळत नसावे. याची परिणती होते ती स्वतःचे जीवन संपवण्याचा विचार करून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणे, निराशेत जाणे, मानसिक व्याधीग्रस्त होणे इत्यादींमध्ये. यश पचवण्याची व्यावसायिकता अंगी असेल, तर अपयश पचवणे सहजसोपे आणि सुलभ जाते. आयुष्याच्या प्रवासात यश-अपयश सतत आपली दारे ठोठावत असतात. त्यामुळे आपण नेहमी सतर्क आणि सकारात्मक असले पाहिजे. रतन टाटा यांचे याविषयीचे एक विधान महत्त्वपूर्ण आहे. ते म्हणतात, ‘‘आयुष्यात पुढे जाण्यासाठी चढ-उताराचे महत्त्व आहे. जसे रुग्णाचा ईसीजी अहवाल काढतांना त्यातील रेषा सरळ येत असेल, तर रुग्ण मृत झाल्याचे मानले जाते. त्यामुळे चढ-उतार हवेतच.’’ आत्मनिर्भर होऊ पहाणारा भारत आज विकासाच्या दिशेने वेगाने पावले टाकत आहे. येथे केवळ विकासच साध्य करून होणार नाही, तर देशातील प्रत्येकच नागरिकाची आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने जडणघडण व्हायला हवी. तोच भारत खऱ्या अर्थाने समृद्ध होऊ शकतो. इंग्रजांच्या तावडीतून भारताला स्वातंत्र्यसेनानी आणि क्रांतीकारक यांनी सोडवले अन् स्वातंत्र्य मिळवून दिले; पण ते कशाच्या बळावर ? जिद्द, ध्येय, मेहनत आणि कष्ट यांमुळेच ! त्यामुळे ही चतुःसूत्री लक्षात ठेवल्यास यशाला गवसणी घालणे निश्चित साध्य होईल. ८४ वर्षीय रतन टाटा यांच्यासारखा उत्साहाचा खळखळता झराच भारत देशाला लाभला आहे. त्यांच्यासारखे व्यक्तीमत्त्व पुन्हा निर्माण होणे विरळाच ! त्यांच्यासमोर प्रत्येकाने नतमस्तक व्हायला हवे. देशाच्या यशोशिखरात मानाचा तुरा रोवणारी रतन टाटा यांच्यासारखी व्यक्ती प्रत्येक भारतियाच्या मनात अजरामर राहील, हे निश्चित !
वयाच्या ८४ व्या वर्षी पुढील आयुष्याची कार्यनिश्चिती करणे, म्हणजे दुर्दम्य इच्छाशक्तीच ! |