देशातील न्यायालयांत हातात तराजू घेतलेल्या महिलेची मूर्ती हटवून भगवान चित्रगुप्त यांची मूर्ती स्थापन करा !
|
सोनभद्र (उत्तरप्रदेश) – भारतातील सर्व न्यायालयांत हातात तराजू घेतलेली आणि डोळ्यावर काळी पट्टी बांधलेली महिलेची मूर्ती असते. ही मूर्ती युनानी समाजसेविका ‘डिकी’ हिची आहे. ही मूर्ती हटवून त्या जागी हिंदूंची देवता भगवान चित्रगुप्त यांची मूर्ती स्थापन करण्यात यावी, अशी मागणी उत्तरप्रदेशमधील संयुक्त अधिवक्ता महासंघाचे प्रदेशाध्यक्ष राकेश शरण मिश्र यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे पत्र लिहून केली. या पत्राची प्रत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सरन्यायाधीश आदींनाही पाठवण्यात आली आहे.
या पत्रात मिश्र यांनी म्हटले आहे की, डिकी हिचे भारतीय संस्कृतीशी काहीही देणे-घेणे नाही. ही मूर्ती केवळ इंग्रजांच्या गुलामीचे प्रतीक असून ती पाहिल्यावर याची सतत जाणीव होत रहाते. भारतीय हिंदु धर्मानुसार आणि शास्त्रात लिहिल्यानुसार भगवान चित्रगुप्त परम न्यायाधीश आहेत. त्यामुळे डिकी हिची मूर्ती हटवून त्यांच्या जागी चित्रगुप्त यांनी मूर्ती स्थापन करण्यात यावी.
संपादकीय भूमिकाअशी मागणी का करावी लागते ? सरकारने स्वतःहून याचा विचार करून भगवान चित्रगुप्त यांची मूर्ती स्थापन करावी ! |