जगाने भारताची विचारप्रकिया समजून घेण्यासाठी महाभारताचे अध्ययन करावे ! – डॉ. एस्. जयशंकर, परराष्ट्रमंत्री

केंद्रीय परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर (उजवीकडे)

नवी देहली – भारताला स्वत:ची रणनीती काय असायला हवी आणि स्वतःचे काय ध्येय असायला हवे, हे समजून घेण्यासाठी, तसेच जगाने भारताची विचारप्रकिया समजून घेण्यासाठी महाभारताचा अभ्यास करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी केले. ‘जे राष्ट्र आपल्या भूतकाळाचा आदर करत नाही, त्याला भविष्य नसते’, असे त्यांनी या ग्रंथातील एका अध्यायाचा संदर्भ देत सांगितले. ‘जागतिक समुदायाला खुश करण्याऐवजी स्वत:च्या अस्मितेवर विश्‍वाश ठेवून जगाशी संवाद साधला पाहिजे’, असे आम्हाला वाटते. रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाला विरोध करण्यासाठी पाश्‍चिमात्य देशांकडून भारतावर दबाव वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर परराष्ट्रमंत्र्यांनी हे मत व्यक्त केले. भारताच्या परराष्ट्र धोरणाचे समर्थन करतांना डॉ. जयशंकर यांनी ‘रायसीना संवाद’ मध्ये वरील मते स्पष्टपणे मांडली.

१. ते म्हणाले की, भारताला एखाद्या सूत्राच्या अनुषंगाने कृती करतांना इतर देशांच्या संमतीची आवश्यकता आहे, ही संकल्पना मागे टाकण्याची आवश्यकता आहे.

२. ‘आम्ही कोण आहोत ?’, याची आम्हाला खात्री आहे. जग जसे आहे, तसे त्याला खुश करण्यापेक्षा ‘आम्ही कोण आहोत ?’ यावर आधारित जगाशी संवाद साधण्याची आवश्यकता आहे.

३. भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा देशाचा ७५ वर्षांचा प्रवास आणि पुढील वाटचाल यांविषयी बोलतांना जयशंकर म्हणाले की, आपल्याला जगात आपले स्थान निर्माण करण्याची आवश्यकता आहे.

४. भारताच्या विकासाचा लाभ जगाला होणार आहे, हे आपण दाखवून द्यायला हवे, असेही ते म्हणाले.