हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी ‘शिवशक्ती महायज्ञ’ पार पडला !
कराड, २८ एप्रिल (वार्ता.) – हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या वतीने पारंपरिक शिवजयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील एक कार्यक्रम म्हणून बलशाली हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी २७ एप्रिल या दिवशी कृष्णामाई घाट, प्रीतीसंगम या ठिकाणी ‘शिवशक्ती महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले होते. या यज्ञाच्या यजमानपदी हिंदू एकता आंदोलनचे अध्यक्ष श्री. विक्रम विनायक पावसकर आणि त्यांच्या पत्नी सौ. रूपा विक्रम पावसकर होत्या.
यज्ञाचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतमाता यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आला. यज्ञासाठी द्वारका, गुजरात येथील जगद्गुरु सूर्य आचार्य कृष्णगिरीजी महाराज, सोळशी (सातारा) येथील प.पू. शिवयोगी नंदगिरी महाराज, आंबेरी (सातारा) येथील महंत श्री दिलीपगिरी गोसावी महाराज यांची प्रमुख उपस्थित होती. या यज्ञात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदू एकता आंदोलन आणि सनातन संस्था यांचा सहभाग होता.
या प्रसंगी हिंदू एकता आंदोलन महाराष्ट्र प्रांतचे अध्यक्ष श्री. विनायक पावसकर, हिंदू एकता आंदोलनाचे श्री. चंद्रकांत जिरंगे, सातारा जिल्हाउपाध्यक्ष श्री. रूपेश मुळे, सातारा जिल्हा कार्याध्यक्ष श्री. राहुल यादव, हिंदू एकता आंदोलन सातारा जिल्हा संघटक श्री. अजय पावसकर, कराड शहराध्यक्ष श्री. प्रकाश जाधव, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सागर आमले, सनातन संस्थेचे श्री. लक्ष्मण पवार, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मदन सावंत उपस्थित होते.
हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रतिदिन सूर्यनारायणाला प्रार्थना करा ! – विवेकशास्त्री गोडबोले, सातारा
जगात केवळ हिंदु धर्म हा एकमेव असून बाकी अन्य पंथ आहेत. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रतिदिन सूर्यनारायणाला प्रार्थना करा. शिवजयंती उत्सवाच्या कालावधीत यज्ञासारखे पवित्र कार्य ठेवल्याने त्याचा लाभ समस्त हिंदु समाजासाठी होणार आहे, असे मत श्री. विवेकशास्त्री गोडबोले यांनी व्यक्त केले.
शिवजयंतीच्या निमित्ताने २१ एप्रिलपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून २९ एप्रिलच्या रात्री ७ वाजता राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे यांचे कीर्तन आणि २ मे या दिवशी सायंकाळी ६ वाजता महिलांची दुचाकी शोभायात्रा होईल. |