मशिदींवरील भोंगे उतरवल्याविषयी योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन !
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारविषयी कौतुकोद्गार !
मुंबई – उत्तरप्रदेशमध्ये ११ सहस्रांहून अधिक धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले असून ३५ सहस्रांहून अधिक ठिकाणी भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तरप्रदेशमध्ये सत्तेत असणाऱ्या योगी आदित्यनाथ सरकारचे कौतुक केले आहे. राज ठाकरे म्हणाले, ‘‘उत्तरप्रदेशमधील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याविषयी योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार ! आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’ ! महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी मिळो, हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना !’’
महाराष्ट्रातही एकूण १० सहस्र ९२३ भोंगे हटवले !
महाराष्ट्रात सरकारने ३० एप्रिलपर्यंत भोंग्यांच्या आवाजाच्या संदर्भात तातडीने कारवाई करण्यासंदर्भातील निर्देश जिल्हास्तरीय प्रशासनाला दिल्यानंतर राज्यात भोंग्यांच्या विरोधातील मोहीम चालू आहे. ‘त्यानुसार आतापर्यंत एकूण १० सहस्र ९२३ भोंगे हटवण्यात आले असून ३५ सहस्र २२१ भोंग्यांच्या आवाजाला मर्यादा घालून दिली आहे’, अशी माहिती अतिरिक्त निर्देशक सचिव (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी दिली.
उत्तरप्रदेशमध्ये मशीद आणि मंदिर येथे अनेकांकडून स्वेच्छेने आवाजावर मर्यादा घालण्याचा निर्णय !
लक्ष्मणपुरीमधील (लखनौ) इदगाहचे इमाम (इस्लामी नेते) असणारे मौलाना खलिद रशिद फिरंगी महाली म्हणाले, ‘‘आम्ही सर्व मशिदींमधील भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले असून आवाज मशिदीबाहेर येणार नाही, याची काळजी घेण्यास सांगितले आहे.’’ मथुरेमधील श्रीकृष्णजन्मभूमी मंदिराने प्रतिदिन पहाटे ५ वाजता भोंग्यावर लावली जाणारी ‘मंगलचरण आरती’ न लावण्याचा निर्णय घेतला. भागवत भवन येथे श्रीकृष्णजन्मभूमीच्या आवारामध्ये प्रतिदिन पहाटे ५ वाजता भोंग्यावरून १ घंटा आरती ऐकवली जायची. अयोध्येसहित इतर शहरांमधूनही अनेक धार्मिक स्थळांनी स्वेच्छेने आवाजावर मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला आहे.