कोरोना महामारीच्या कठीण काळात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असूनही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अढळ श्रद्धा ठेवणारे बांदोडा (गोवा) येथील भाजीविक्रेते श्री. मदनप्रसाद जैसवाल (वय ६३ वर्षे)!

१. स्वतःच्या सहज बोलण्यातून लोकांना ‘राम, राम’ म्हणण्याची सवय लावणे

श्री. मदनप्रसाद जैसवाल

अनुमाने १२ वर्षांपूर्वी श्री. मदनप्रसाद जैसवाल हे उत्तरप्रदेशातून बांदोडा (गोवा) येथे रहावयास आले. चरितार्थ चालवण्यासाठी ते हातगाडीवरून भाजी विकू लागले. मी बाहेरून घरी येता-जातांना बऱ्याचदा माझी त्यांच्याशी भेट होत असे. ते मला आणि सर्वांना हसतमुखाने ‘राम, राम’ म्हणतांना दिसायचे. त्यामुळे बरेच लोक त्यांची गंमत करण्यासाठी ‘राम, राम’ म्हणू लागले आहेत. जैसवालदादांची गंमत करायची; म्हणून का होईना, त्या लोकांच्या मुखात रामनाम येते. यावरून ‘आपल्या वर्तनाने सहजतेने अध्यात्मप्रसार घडू शकतो’, हे मला शिकायला मिळाले.

२. मातृभाषा हिंदी असूनही मराठी दैनिक ‘सनातन प्रभात’ विकत घेऊन ते आस्थेने वाचणे

जैसवालदादा बांदोडा येथे आल्यापासून त्यांना सनातन संस्था, रामनाथी आश्रम आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी माहिती आहे. ते संस्थेला भाजी अर्पण करत असत. दादांची मातृभाषा हिंदी असूनही ते मराठी दैनिक ‘सनातन प्रभात’ विकत घेऊन ते आस्थेने वाचतात. सध्या त्यांची आर्थिक स्थिती बरी नसली, तरी ते त्याच आस्थेने दैनिक ‘सनातन प्रभात’ विकत घेऊन वाचतात.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असणे

श्री. दीपक छत्रे

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या दळणवळण बंदीच्या काळात दादा नाईलाजाने व्यवसाय बंद करून त्यांच्या गावी गेले. आता परत आल्यावर त्यांनी पुन्हा भाजी विकणे चालू केले. एकदा मी भाजी घेण्यासाठी त्यांच्या दुकानात गेलो असता बोलता बोलता समजले की, ते अनेक अडचणींना सामोरे जात आहेत. पूर्वीपासून त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा आहे. त्यामुळे सध्याच्या कठीण काळातही ते म्हणतात, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच मी आजपर्यंत तग धरून आहे.’’ त्यांचे बोलणे ऐकतांना मला वाटले, ‘भरल्यापोटी गुरुचरणांविषयी बोलणे ठीक असते; परंतु अनंत अडचणी असतांनाही गुरुचरणांप्रती दादांची श्रद्धा तसूभरही न्यून झालेली नाही.’ यातून मला त्यांच्याकडून अध्यात्म जगण्याचा पाठच मिळाला.

दादांकडे पाहून मी प्रयत्नपूर्वक प्रार्थना केली, ‘हे सर्वव्यापक जगत्पालका, जगदीशा, तुझ्या कृपनेच मी जगत आहे. वेगवेगळ्या प्रसंगांतून तूच मला अध्यात्म जगण्याचे महत्त्व पटवून देतोस. ‘मला प्रारब्ध सहन करून अध्यात्म जगण्याची शक्ती द्यावी’, ही कळकळीची प्रार्थना आहे.

– श्री. दीपक रामचंद्र छत्रे, रायंगिणी, बांदोडा, गोवा. (१४.१.२०२२)