पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरक्षित जागेवरील अतिक्रमण त्वरित हटवावे ! – ‘जनसंवाद सभे’ची मागणी
पिंपरी-चिंचवड – संरक्षणपात्र झोपड्यांच्या हस्तांतरणाविषयी शासन निर्णयाची कार्यवाही करावी, रस्त्यावरील अनधिकृत वाहनतळांवर कारवाई करावी, महापालिकेच्या ताब्यातील आरक्षित जागेवर झालेले अतिक्रमण त्वरित हटवावे, अशी मागणी नागरिकांनी २५ एप्रिल या दिवशी झालेल्या जनसंवाद सभेत केली. ई-क्षेत्रीय कार्यालयात पार पडलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ होते, तसेच संबंधित विभागांतील मुख्य अधिकारीही उपस्थित होते.
या वेळी महापालिकेच्या आरक्षित जागेवर नामफलक लावावेत, रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई करावी, रस्ते आणि विकासकामे वेळेत पूर्ण करावीत, रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा, अशा स्वरूपाच्या तक्रारीवजा सूचना या ‘जनसंवाद सभे’मध्ये करण्यात आल्या.
अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ म्हणाले, ‘‘सभेमध्ये केलेल्या तक्रारवजा सूचनांवर केलेल्या कार्यवाहीचे उत्तर वेळेत दिले पाहिजे. आपला दृष्टिकोन नेहमी सकारात्मक ठेवावा. यंत्रणेमध्ये दोष असतील, तर ते दूर केले पाहिजेत. या जनसंवाद सभेच्या माध्यमातून नागरिकांचे समाधान झाले का ? याकडे प्रत्येकाने कटाक्षाने लक्ष द्यावे.’’
संपादकीय भूमिकाअशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ? जनतेची अडचण दिसत नाही की, यामध्येही भ्रष्टाचार केलेला आहे, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? |