झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण प्रकल्प वाचवण्याची राज्यपालांकडे विनंती !
झोपडपट्टीवासियांच्या संघटनेचे राज्यपालांना निवेदन
मुंबई – देशातील सर्वांत महागडा आणि बहुचर्चित एस्.आर्.ए. (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) प्रकल्प वाचवण्याची विनंती राज्यपालांकडे करण्यात आली आहे. स्थानिक झोपडपट्टीतील रहिवाशांच्या २३ सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या गटाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना याकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे. त्यांनीही याकडे लक्ष देण्याचे आश्वासन दिले आहे. हा प्रकल्प लष्करी क्षेत्राच्या ५०० मीटरच्या आत येत असल्याने सैन्याकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेण्याचे ठरले; पण झोपडपट्टीवासियांच्या संघटनेने राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘‘लष्करी क्षेत्राला कोणत्याही बाजूने धोका नाही. येथे मोठमोठ्या व्यावसायिक आणि अन्य इमारती आहेत; मग गरिबांच्या झोपडपट्टीवासियांच्याच प्रकल्पाला विरोध का ?’’
कफ परेड हा दक्षिण मुंबईचा देशातील सर्वांत महागडा परिसर समजला जातो. तेथील एका भागात २३ झोपडपट्ट्या आहेत. तेथे रहाणाऱ्या ७ सहस्रांहून अधिकांना लाभ होणार होता. प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर झोपडपट्ट्या विकसित करण्याची प्रक्रिया चालू झाली. या प्रकल्पाच्या अंतर्गत २८ एकरांवर पसरलेल्या परिसरात ३० मजली उंचच उंच इमारती उभ्या रहाणार आहेत.