कीर्तनाला संत साहित्याचा भक्कम आधार !
‘जगातील आंधळ्या-पांगळ्याला दया दाखवू नका. मागच्या जन्मात त्यांनी कोणते चांगले काम केले नाही. त्यामुळे त्यांचे डोळे, कान, नाक, हात-पाय देवाने दिव्यांग (अपंग) केले आहेत. त्यांना कोणत्या प्रकारचे साहाय्य करू नका’, अशा आशयाचे विधान कीर्तनकार ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी केले आहे. यामुळे कीर्तनकार पाटील आणि अपंगांविषयी काही विधाने केल्यामुळे ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या कीर्तनांवर २० वर्षे बंदी घालावी, अशी तक्रार ‘अपंग विकास संघा’चे अध्यक्ष अमोल बनकर यांनी दिव्यांग आयुक्तांकडे प्रविष्ट केली आहे.
ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या वक्तव्याचे निश्चितच समर्थन करता येणार नाही; पण ‘मागच्या जन्मात केलेल्या अयोग्य कर्मांचे फळ म्हणून ते अपंग झाले आहेत’, या विधानाचा अध्यात्माच्या आधारे अभ्यास करता येईल. कर्मफलन्यायानुसार मागील जन्मातील कुकर्मांचे फळ आपण या जन्मात भोगत असतो. चांगल्या कर्माचे फळ पुण्य, तर वाईट कर्माचे फळ पाप देते. मनुष्यजन्माचा दुरुपयोग करून अधिक पाप केलेल्या जिवांना पुन्हा तो जन्म लवकर मिळत नाही. मनुष्याचे जीवन कर्ममय, तर ईश्वरी नियमानुसार कर्मफळ अटळ आहे.
कीर्तनकार कीर्तनांतून समाजाला एकप्रकारे धर्मशिक्षण देत असतात. काही कीर्तनकार कीर्तनाचा मुख्य उद्देश विसरत असले; म्हणून सर्वांनाच दोष देता येणार नाही. संत नामदेव महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज आदी अनेक संतांनी मोगल आक्रमणाच्या काळात हिंदु धर्माला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी कीर्तन, भजन, अभंग यांच्या माध्यमातून लोकजागृतीतून धर्मरक्षणाचे कार्य केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्य-स्थापनेच्या कार्यातही संतांचे बहुमोल योगदान आहे. राष्ट्रसंत दासगणू महाराज यांनी त्यांच्या कीर्तनभक्तीच्या माध्यमातून देशभक्ती आणि स्वराज्य यांसाठी योगदान दिले आहे. कीर्तनकारांनी समाजात जागृती आणि प्रबोधन करून अध्यात्मप्रसार अन् प्रबोधन यांचे कार्य केले आहे. आजही कीर्तनाला संत साहित्याचा भक्कम आधार आहे. त्यामुळे कीर्तनकार सांगत असलेल्या कीर्तनाचा मतीतार्थ समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करण्यातच स्वहित आहे.
– सौ. अपर्णा जगताप, पुणे