प्रशासन धोकादायक पुलावर दुर्घटना घडण्याची वाट पहात आहे का ? – संजय जोशी, सुराज्य अभियान
राजापूर तालुक्यातील ‘दांडे-अणसुरे’ धोकादायक पुलाच्या दुरुस्तीविषयी प्रशासनाची अक्षम्य उदासीनता !
रत्नागिरी, २७ एप्रिल (वार्ता.) – राजापूर तालुक्यातील दांडे-अणसुरे पुलाची स्थिती अत्यंत धोकादायक झाली आहे. हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियान’ उपक्रमाच्या अंतर्गत याविषयी जागृती करण्यात आली. डिसेंबर २०२१ मध्ये या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्यासह तेथे विविध सुविधा उपलब्ध करण्याची मागणीही करण्यात आली; मात्र अद्यापपर्यंत प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. रायगड जिल्ह्यात सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेनंतरही येथील जिल्हा प्रशासन झोपलेले आहे. प्रशासन या धोकादायक पुलावर दुर्घटना घडण्याची वाट पहात आहे का ? असा प्रश्न ‘सुराज्य अभियान’चे रत्नागिरी समन्वयक श्री. संजय जोशी यांनी उपस्थित केला. ते येथील ‘शेषाराम हॉल’मध्येे २७ एप्रिल या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
या वेळी श्री. जोशी म्हणाले की,
१. शासनाने सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेनंतर समिती स्थापन करून अहवाल दिला; पण त्याचे पालन शासनाकडून केले गेले नाही, त्यामुळेच पुलांची ही दुर्दशा आहे.
२. राजापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘सुराज्य अभियाना’च्या पत्राला अतिशय दायित्वशून्यपणे उत्तरे दिली आहेत.
‘दांडे-अणसुरे’ पुलाची धोकादायक अवस्था !
३. पत्रात नमूद केले आहे की, ११.७.२०१९ या दिवशी रत्नागिरी जिल्हाधिकार्यांनी दांडे-अणसुरे पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले होते. ‘प्रशासनाच्या लालफितीचा भोंगळ कारभार कसा चालतो ?’ हेही आम्हाला या प्रकरणात दिसून आले. दांडे-अणसुरे पुलाच्या दुरुस्तीचे काम ‘विशेष दुरुस्ती’ अंतर्गत संमत झाले; प्राप्त निविदा अधिक दराने आल्याने फेटाळली होती; तरीही फेरनिविदा काढली नाही.
४. पुलाचे काम मार्च २०२१ च्या अर्थसंकल्पात पुन्हा संमत करण्यात आले; मात्र समयमर्यादेत काम न झाल्याने बांधकाम विभागाने कामाची मुदत वाढवून मागितली. ती मान्य झाल्यावर सप्टेंबर २०२१ मध्ये सविस्तर अंदाजपत्रक मुख्य अभियंत्यांना सादर करण्यात आले. मुख्य अभियंत्यांनी छाननी करतांना त्या आराखड्यात काही फेरबदल सुचवले. त्यानुसार सुधारणा करून नवीन अंदाजपत्रक फेरसादर करायला बांधकाम विभागाला ५ महिने लागले.
५. फेब्रुवारी २०२२ मध्ये नवीन अंदाजपत्रक मुख्य अभियंत्यांना सादर करण्यात आले. अद्याप हे अंदाजपत्रक संमत झालेले नाही, तसेच निविदा प्रक्रिया झालेली नाही, असे पत्रात नमूद केले आहे. यातून प्रशासनाची अक्षम्य उदासीनता दिसून येते.
(सौजन्य : RNO Right News Online)
धोकादायक पुलावरून सर्रासपणे एस्.टी. आणि खासगी बसची वाहतूक चालू ! – विनोद गादीकर, हिंदु जनजागृती समिती
पुलाच्या वर्तमानस्थितीविषयी श्री. विनोद गादीकर म्हणाले की, अवजड वाहतूक थांबवण्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूस प्रवेशद्वार चौकट (पोर्टल फ्रेम) उभी करण्यात आली होती; मात्र सध्या तेथे कोणतीही ‘पोर्टल फ्रेम’ नाही. पुलाच्या धोकादायक स्थितीमुळे महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने या पुलावरील एस्.टी. गाड्यांची वाहतूक बंद केली होती. असे असले, तरी सध्या या पुलावरून सर्रासपणे एस्.टी. आणि खासगी बसची वाहतूक चालू आहे. या पुलावरील रस्ता खचला आहे, दिव्यांची व्यवस्था नाही, सुरक्षा ‘रेलिंग’ही खचले आहे, ‘ब्लिंकर’ लावलेले नाहीत.
‘सुराज्य अभियाना’ अंतर्गत आंदोलनाची चेतावणी‘हा पूल वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करून तातडीने दुरुस्ती करण्यात यावी’, अशी मागणी ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने पुन्हा करण्यात आली. जोपर्यंत ही दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत पुलाच्या दोन्ही बाजूला नागरिकांच्या जागृतीसाठी तपशील देणारा ‘फ्लेक्स’ लावण्याची संमती मागण्यात आली, असे न झाल्यास आंदोलन छेडावे लागेल, अशी चेतावणीही ‘सुराज्य अभियाना’कडून देण्यात आली. |