गोव्यात वीज दरवाढीविषयी पुढील ८ दिवसांत अधिसूचना

  • गोवा मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णय

  • युनिटमागे ५ ते १० पैसे वाढणार ! – सुदिन ढवळीकर, वीजमंत्री

गोवा येथील अपरिहार्य वीज दरवाढ

पणजी, २७ एप्रिल (वार्ता.) – वीजदेयकांमध्ये प्रतियुनिट ५ ते १० पैशांची वाढ होणार आहे. दरवाढीच्या धारिकेला मुख्यमंत्र्यांनी संमती दिली आहे. आता केवळ अधिसूचना प्रसिद्ध करायचे सोपस्कार बाकी आहेत. पुढील ८ दिवसांत ही अधिसूचना काढण्यात येणार आहे आणि त्यानंतर दरवाढ लागू होईल, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी ही माहिती दिली.

ते पुढे म्हणाले, ‘‘संयुक्त वीज नियमन आयोगाने दरवाढ सुचवली होती. दरवाढ लागू करणे क्रमप्राप्त होते, अन्यथा भूमीगत वीजवाहिन्या, तसेच अन्य कामे आयोगाने रोखली असती. आयोगाने वर्ष २०१९ मध्ये दरवाढ सुचवली असली, तरी महामारीच्या पार्श्‍वभूमीवर त्या वेळी त्याची कार्यवाही न करता ती पुढे ढकलण्यात आली. वीज खात्यात साहित्याची टंचाई आहे आणि याचा वीजपुरवठ्यावरही परिणाम होत आहे. गेल्या आठवडाभरात साहित्य खरेदीसाठीच्या ३० धारिका मी संमत केल्या आहेत.’’