नागपूर येथे खासदार नवनीत राणा यांच्याकडून खासदार संजय राऊत यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीची तक्रार प्रविष्ट !

नागपूर – खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात २६ एप्रिल या दिवशी येथील पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीची तक्रार प्रविष्ट केली आहे. येथील पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे ही लेखी तक्रार देण्यात आली आहे.

नागपूर येथे संजय राऊत म्हणाले, ‘‘जे पळून गेलेले आहेत, आज त्यांचे बहाणे काहीही असतील. यापुढे जर ‘मातोश्री’ आणि शिवसेना यांच्या नादाला कुणी लागले, तर त्यांनी आपल्या गोवऱ्या स्मशानात रचून याव्यात. ही शिवसैनिकांची भाषा आहे. हा संताप आणि राग आहे. मी जे बोलतो आहे, त्याचा परिणाम भोगायला मी सिद्ध आहे.’’ या वक्तव्याचा आधार घेत खासदार नवनीत राणा यांनी तक्रार प्रविष्ट केली.

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत रवि राणा यांना नागपूर येथील पत्रकार परिषदेत ‘२० फूट खड्यात गाडण्याची आणि स्मशानात गोवऱ्या रचून ठेवण्याची भाषा करणारे शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर भारतीय दंड विधान संहिता कलम १५३(अ), २९४ आणि ५०६ अंतर्गत तातडीने गुन्हा नोंद करून अटक करा’, अशी मागणी करणारे निवेदन आणि लेखी तक्रार ‘युवा स्वाभिमानी संघटने’ने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले आहे.