सोलापूर येथे जुन्या आणि नवीन भोंग्यांसाठी अनुमती घेण्याच्या पोलिसांच्या सूचना !

सोलापूर – भोंग्यांसाठी सकाळी ६ ते रात्री १० या वेळेतच अनुमती असेल. औद्योगिक, व्यापारी आणि निवासी क्षेत्रांसमवेतच शांतता क्षेत्रामध्ये ५० ते ७५ डेसिबलहून अधिक आवाज असू नये, तसेच मशिदींसह मंदिरांवरील जुन्या भोंग्यांना अनुमती घेऊन ते नियमित करावेत, तर नवीन भोंगे लावण्यापूर्वी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांची अनुमती घ्यावी, अशा सूचना सोलापूर पोलिसांनी केल्या आहेत.

१. येथील एका हनुमान मंदिरावर २६ एप्रिल या दिवशी भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी दिलेला नवीन भोंगा लावून त्यावरून हनुमान चालिसा वाजवण्यात आली. पोलिसांनी त्याठिकाणी त्वरित धाव घेऊन संबंधितांना अनुमती घेण्याचे आवाहन केले. त्या वेळी उपस्थितांनी ‘शहरातील किती मशिदींवरील भोंग्यांना अनुमती आहे ?’, असा उलट प्रश्न पोलिसांना विचारला, तर भाजपचे आमदार आणि माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी ‘पोलिसांची भूमिका सर्वांसाठी समान असावी, अन्यथा आंदोलन केले जाईल’, अशी चेतावणी दिली. (यापूर्वी किती मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांना अनुमती घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते ? पोलिसांनी भूमिका समान ठेवावी यासाठी आंदोलन करण्याची चेतावणी द्यावी लागणे, हे पोलिसांसाठी लज्जास्पद. पोलीस स्वतःची प्रतिमा सर्वांसाठी समान का करत नाहीत ? – संपादक)

२. त्यानंतर पोलिसांनी शहरातील सर्व मंदिरे आणि मशिदी यांवरील भोंग्यांसाठी अनुमती घेण्याचे आदेश दिले आहेत, तसेच आवाजाची मर्यादा ओलांडू नये, असे आवाहनही केले आहे. सप्ताहातील एक दिवस त्या भोंग्यांच्या आवाजाची मर्यादा मोजण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

नवीन भोंग्यासाठी ‘ऑनलाईन’ अर्ज करण्याचे आवाहन !

ज्या मंदिरांतील भोंगे नादुरुस्त आहेत किंवा ज्यांना नवीन भोंगा हवा आहे, त्यांना तो दिला जाणार आहे. त्यासाठी ‘ऑनलाईन’ अर्ज करण्याचे आवाहन भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी केले आहे.

हनुमान मंदिरांवरील भोंगे बळजोरीने उतरवण्याचा प्रयत्न केल्यास रस्त्यावर उतरू ! – विजयकुमार देशमुख, आमदार, भाजप

शहरातील प्रत्येक हनुमान मंदिरावरून हनुमान चालिसा वाजवण्यासाठी भोंगे लावायला पोलिसांकडून अनुमती मिळावी, एवढीच अपेक्षा आहे. हनुमान मंदिरावरील भोंगे बळजोरीने उतरवण्याचा प्रयत्न केल्यास त्याविरोधात आम्ही रस्त्यावर उतरू.