आईस्क्रीम खाण्यापूर्वी आरोग्याच्या दृष्टीने विचार करा !
उन्हाळ्यात उष्णतेवर मात करण्यासाठी आईस्क्रीम, कुल्फी असे थंड पदार्थ आवर्जून खाल्ले जातात. आईस्क्रीम हे बहुतांश सर्वांचे आवडते असल्यामुळे उन्हाळ्यात त्याची मागणी वाढते; परंतु हे बर्फाचे थंड पदार्थ खरोखरच तुम्हाला थंडावा देतात का ? तर याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. याखेरीज आईस्क्रीममुळे तुम्हाला कडक उन्हात थंडावा जाणवतो; पण त्याचे अतीसेवन आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांनाही जन्म देऊ शकते.
आईस्क्रीम शरिराला थंडावा नाही, तर उलट शरिरात उष्णता निर्माण करणारे असणे
खरे तर आईस्क्रीम तुमच्या शरिरात उष्णता निर्माण करते. थंड पदार्थ शरीर गरम कसे करणार ? तर यामागे कारण आहे. जेव्हा आपण काही खातो, तेव्हा आपले शरीर ते पचवण्याचे काम करते. ही प्रक्रिया करतांना ऊर्जा वापरली जाते आणि शरिराचे तापमान वाढवते. काही अन्नपदार्थ पचण्यासाठी अधिक, तर काहींना अल्प ऊर्जा वापरली जाते. जसे की अधिक चरबी, प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स (पिष्टमय पदार्थ) असलेले अन्न पचण्यासाठी शरिराला जास्त कष्ट घ्यावे लागतात.
आईस्क्रीम खातांना थंडपणा जाणवतो; पण त्यात ‘फॅट’चे (चरबीचे) प्रमाण जास्त असते आणि म्हणूनच तुमच्या शरिराला ते पचण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. यामुळे तुमच्या शरिरात उष्णता वाढते आणि ते गरम होते. याचा अर्थ असा की, आईस्क्रीम खातांना ते कितीही थंड वाटत असले, तरी ते शरिराला थंडावा देत नाही, तर उलट शरिरात उष्णता निर्माण करते.
आईस्क्रीमचे अतीसेवन ठरू शकते घातक !
आईस्क्रीममध्ये दूध, चॉकलेट, अनेक प्रकारचे ड्रायफ्रूट्स (सुकामेवा), चेरी इत्यादींचा वापर केला जातो. त्यांचे अनेक आरोग्यदायी लाभही आहेत; परंतु आईस्क्रीम अधिक खाल्ल्याने काय हानी होऊ शकते ? हे ठाऊक असणे आवश्यक आहे.
१. आईस्क्रीममध्ये साखर, कॅलरीज (उष्मांक), फॅट असते, जे आरोग्यासाठी लाभदायक नाही. त्यामुळे लठ्ठपणा आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
२. आईस्क्रीममध्ये पिष्टमय पदार्थांचे प्रमाण अधिक असते. अशा स्थितीत ‘रिफाईंड कार्बोहायड्रेट्स’च्या अतीसेवनामुळे पोटात चरबी जमा होऊ लागते. तथापि ‘कार्बोहायड्रेट्स’मध्ये ऊर्जेचा एक चांगला स्रोत आहे, म्हणून तुम्ही आईस्क्रीमचे सेवन न्यून प्रमाणात केले पाहिजे.
३. आईस्क्रीममध्ये ‘सॅच्युरेटेड फॅट’ असते. (जे स्निग्ध पदार्थ सामान्य तापमानामध्ये ठेवल्यास गोठतात, त्यांना ‘सॅच्युरेटेड फॅट’ म्हणतात.) आईस्क्रीम खाल्ल्याने ‘ट्रायग्लिसराइड्स’ आणि ‘कोलेस्ट्रॉल’ची पातळी वाढते. जर एखाद्याला उच्च रक्तदाब आणि जास्त वजन असेल, तर प्रतिदिन पुष्कळ आईस्क्रीम खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
४. एका संशोधनानुसार ‘सॅच्युरेटेड फॅट’ आणि साखरयुक्त आहारामुळे विशिष्ट कौशल्ये अन् स्मरणशक्ती न्यून होऊ शकते. हे फक्त एक कप आईस्क्रीम खाऊनही होऊ शकते.
५. आईस्क्रीममध्ये भरपूर साखर असते, ज्याचे सेवन केल्यानंतर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. अशा परिस्थितीत मधुमेह असणाऱ्यांनी आईस्क्रीमचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.
६. आईस्क्रीममध्ये फॅट जास्त असते, जे पचायला जास्त वेळ लागतो. सहसा यामुळे सूज येणे, अपचनाची समस्या उद्भवते. रात्री आईस्क्रीम खाल्ल्यानंतर ते लवकर पचत नसल्याने चांगली झोप येत नाही.
(साभार : दैनिक ‘लोकसत्ता’)