महाराष्ट्रातील अनेक कारागृहांत बंदीवानांना भ्रमणभाष पुरवणारी यंत्रणा कार्यरत !
अमली पदार्थांसह अन्य वस्तूंचाही पुरवठा
नागपूर – राज्यात कारागृहांतील बंदीवानांकडून पैसे घेऊन त्यांना भ्रमणभाषसह इतर सुविधा पुरवल्या जात आहेत. दूरभाषवर बोलण्यासाठी बंदीवानांकडून १०० रुपये प्रतिमिनिट वसूल केले जात आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यात एक यंत्रणा सक्रीय असून त्यात कारागृह अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
नागपूर कारागृहात जेवण, तसेच भ्रमणभाषवर बोलण्यासाठी बंदीवानांकडून प्रत्येकी १०० रुपये घेतले जातात !
राज्यातील अनेक कारागृहांत बंदीवानांना सुविधा पुरवण्यासाठी वेगवेगळे शुल्क ठरलेले आहेत. त्यातही नागपूर कारागृहातील शुल्क अधिक असते. वर्ष २०१८ मध्ये नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंदीवानांच्या बराकीची झडती घेतली असता तेथे भ्रमणभाष संच, गांजा, चिलीम अशा अमली पदार्थांसह मद्य आणि शस्त्रेही सापडली होती. नागपूर कारागृहात बंदीवानांकडून भ्रमणभाषवर बोलण्यासाठी प्रतिमिनिट १०० रुपये शुल्क आकारले जाते, तर गांजाची पुडी १ सहस्र रुपये आणि जेवण देण्यासाठी १०० रुपये घेण्यात येत आहेत, अशी माहिती कारागृहाच्या संपर्कात असलेल्या एका विश्वसनीय सूत्राने दिली आहे. बंदीवानांकडे येणाऱ्या या सुखचैनीच्या वस्तू कारागृहातील कर्मचाऱ्यांच्या संगनमताविना येणे शक्य नाही. त्यामुळे येथे एखादी यंत्रणा सक्रीय असण्याची शक्यता वर्तवली जाते.
कारागृहातील चुकीच्या कृत्यांच्या संदर्भातील अन्य सूत्रे
१. बंदीवानांना सुनावणीसाठी न्यायालयात उपस्थित करावे लागते. कारागृह ते न्यायालय यांमधील रस्त्यात बंदीवानांना उपाहारगृहांमधील पदार्थ देण्यासाठी पोलीस नातेवाइकांकडून पैसे घेतात.
२. न्यायालयातून परत कारागृहात नेतांना बंदीवानांना मद्यही पुरवले जाते. काही दिवसांपूर्वीच पुणे येथे कृष्णा मारणे या बंदीवानाला मद्य पुरवल्याप्रकरणी ५ पोलिसांना निलंबित करण्यात आले होते.
३. नाशिक, कोल्हापूर-कळंबा, नागपूर, येरवडा, मुंबई आणि संभाजीनगर या कारागृहांत आतापर्यंत बंदीवानांना गांजा अन् अन्य अमली पदार्थ यांसह भ्रमणभाष संच पुरवण्यात आले होते. या प्रकरणी गुन्हे नोंद झाले असून काही पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली आहे.
४. काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील कळंबा कारागृहातून पाऊण किलो गांजा, १० भ्रमणभाष संच, २ पेनड्राईव्ह आणि ५ चार्जिंग वायरी जप्त करण्यात आल्या होत्या.
५. नागपूर येथील कारागृह लिपीक विक्रम गिर याच्या पिशवीत गांजा सापडला होता. तो बंदीवानांना १ सहस्र रुपयेप्रमाणे गांजा विकत होता. कोल्हापूर येथील कारागृह कर्मचारी किसन हा पायमोज्यातून बंदीवानांपर्यंत चिठ्ठी पोचवण्याचे काम करत होता. १ मास निरोप पोचवण्याचे २५ सहस्र रुपये त्याला मिळत होते.
६. राज्यातील अनेक कारागृहांतील मुख्य प्रवेशद्वार ते थेट बंदीवानांच्या बराकीमध्ये जवळपास १० ते १५ मिनिटांचे अंतर असते. बाहेरच्या अधिकाऱ्याला आतमध्ये सोडण्यापूर्वी सुरक्षेच्या नावावर थांबवण्यात येते. एवढ्या वेळात कारागृहात काही गडबड असल्यास परिस्थिती सावरली जाते.
याविषयी कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे म्हणाल्या, ‘‘कारागृहांत असे प्रकार घडत असतील, तर त्यांचे अन्वेषण करू. त्यात कारागृहांतील कर्मचारी किंवा अधिकारी दोषी आढळून आल्यास कठोर कारवाई करू.’’
संपादकीय भूमिकाजर असे प्रकार घडत असतील, तर ते कारागृह प्रशासनाला लज्जास्पद ! असे करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक ! |