छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार प्रत्येकाने आचरणात आणले पाहिजेत ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी
मिरज, २७ एप्रिल (वार्ता.) – ‘राष्ट्रोद्धार आणि राष्ट्रउन्नती करण्यासाठीच माझा जन्म आहे’, असे प्रतिदिन आपण भगवंतापुढे म्हटले पाहिजे. संबंध जगाचा त्राता म्हणून जी शक्ती आवश्यक आहे ती हिंदुस्थानला मिळाली पाहिजे. ही शक्ती मिळण्यासाठी आपल्याला शिवाजी-संभाजी रक्तगटाची आवश्यकता आहे. शत्रूराष्ट्राला नेस्तनाबूत करणे हेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आहेत आणि ते प्रत्येकाने आचरणात आणले पाहिजेत, असे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी व्यक्त केले. मिरज येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास ५० वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने पुतळा परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले असून विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. त्या प्रसंगी ते बोलत होते.
या प्रसंगी साक्षी पाटील हिने शिवगर्जना म्हणून दाखवली, तर सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी प्रास्ताविक केले. स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांनी स्वागत केले. या वेळी ‘शिवतीर्थ उत्सव समिती’चे निमंत्रक श्री. सुधीर अवसरे, सर्वश्री मकरंद देशपांडे, पांडुरंग कोरे, आनंद राजपूत, सुरेशबापू आवटी, बाबासाहेब आळतेकर, नगरसेवक श्री. संदीप आवटी यांसह हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
पुतळ्याच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्त विविध कार्यक्रम !
या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ उत्सव समितीचे निमंत्रक श्री. सुधीर अवसरे म्हणाले, ‘‘ पुतळ्याच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने २६ एप्रिल ते २ मे या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २८ एप्रिल या दिवशी शाहीर देवानंद माळी यांचा पोवाडा, २९ एप्रिल या दिवशी शिवव्याख्याते ह.भ.प. प्रथमेश इंदुलकर यांचे व्याख्यान, ३० एप्रिल या दिवशी श्री. लखनगुरुजी यांची शिवकालीन शस्त्रविद्या आणि मर्दानी खेळ यांची प्रात्यक्षिके होतील, १ मे या दिवशी सायंकाळी ७ वाजता गोरक्षक श्री. शिवशंकर स्वामी यांना ‘शिवतीर्थ भूषण’ पुरस्कार देण्यात येईल. २ मे या दिवशी सकाळी ७.३० वाजता भाजप आमदार श्री. सुरेश खाडे यांच्या हस्ते पूजा आणि मानवंदना, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मकाळ होईल, तर सायंकाळी ५ वाजता मैदान दत्त मंदिर येथून शिवजयंतीची मिरवणूक निघेल. तरी अधिकाधिक शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा.’’