अयोध्येतील तपस्वी छावणीचे जगद्गुरु परमहंसाचार्य यांना ताजमहालमध्ये जाण्यास रोखले !

ब्रह्मदंड लोखंडी असल्याचे सांगत ते आत नेण्यास केली मनाई !

सुरक्षा अधिकार्‍याकडून नंतर क्षमायाचना !

आगरा (उत्तरप्रदेश) – येथे ताजमहाल पहाण्यासाठी गेलेले अयोध्येतील तपस्वी छावणीचे जगद्गुरु परमहंसाचार्य यांना आत जाण्यास सुरक्षारक्षकांनी रोखले. भगवे वस्त्र आणि हाती ब्रह्मदंड असल्याने त्यांना आत जाण्यापासून रोखल्याचा दावा परमहंसाचार्य यांनी केला आहे. ‘जगद्गुरूंना लोखंडी ब्रह्मदंड आत नेण्यास मनाई करण्यात आली’, असा  दावा सुरक्षा अधिकार्‍यांनी केला आहे. वाद वाढल्यानंतर अधिकार्‍यांनी परमहंसाचार्य यांची क्षमाही मागितली.

१. या घटनेविषयी जगद्गुरु परमहंसाचार्य म्हणाले की, ताजमहालमध्ये पुरलेले शिवलिंग पहाण्यासाठी आलो होते. संध्याकाळी साडेपाच वाजता शिष्यांसह ताजमहालमध्ये प्रवेश करू लागलो, तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या सैनिकांनी मला अडवले आणि भगवे कपडे अन् ब्रह्मदंड यांविषयी आक्षेप घेतला. माझी तिकिटे तपासण्यात आली. माझ्या शिष्याने सैनिकांची छायाचित्रे काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमणभाष संच हिसकावून त्यातील छायाचित्रे पुसण्यात आली.

२. परमहंसाचार्य यांचे शिष्य परमहंस यांनी सांगितले की, भ्रमणभाष निषिद्ध असलेल्या मथुरा, अयोध्या आणि काशी येथील मंदिरांमध्येही ब्रह्मदंडाला कुणीही रोखले नाही. ब्रह्मदंड लोखंडाचा नसून लाकडाचा आहे. भगव्यामुळे आत जाण्यापासून रोखले जाणे चिंताजनक आहे. (भगव्याला रोखण्यात येणे, यासाठी हा भारत आहे की पाकिस्तान ? – संपादक)

३. संपूर्ण प्रकरणाविषयी पुरातत्व अधीक्षक आर्.के. पटेल यांनी सांगितले की, जगद्गुरु परमहंसाचार्य यांनी लोखंडी सळी समवेत घेतली होती. ती समवेत घेण्यास मनाई करण्यात आली होती. सुरक्षा कर्मचार्‍यांनी त्यांना ती बाहेरच ठेवण्यास सांगितले होते; मात्र ते मान्य झाले नाही. त्यांना बाहेर कुणी भडकावले हे ठाऊक नाही.

हिंदुत्वनिष्ठांकडून निषेध !

जगद्गुरु परमहंस यांना ताजमहालमध्ये प्रवेश नाकारल्यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी त्याचा तीव्र निषेध केला आहे. यामुळे येथील पुरातत्व विभागाच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पुरातत्व विभागाच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठ येथे २७ एप्रिलच्या सकाळी पुतळा घेऊन पोचले होते. या वेळी उपस्थित पोलिसांनी पुतळा कह्यात घेतला. हिंदु महासभेने पुरातत्व विभागाच्या विरोधात तक्रार केली आहे.

हिंदुद्वेषी पर्यटकांकडून परमहंसाचार्य यांची चेष्टा !

जगद्गुरु परमहंसाचार्य म्हणाले, ‘तुम्हाला दाढी आहे. टोपी घातली, तर चालेल. भगवा घालून का आलात ?’, असे एका दक्षिण भारतीय पर्यटकाने गंमतीने म्हटल्याचे परमहंसाचार्य यांनी सांगितले. तसेच ‘योगी आदित्यनाथ यांनीही भगवा परिधान केल्याने त्यांना येथे थांबवण्यात आले होते’, अशी माहिती आम्हाला प्रवेशद्वारावर देण्यात आली होती. आम्हाला रोखणार्‍या दोषींवर कारवाई करावी’, अशी आमची मागणी असल्याचेही परमहंसाचार्य म्हणाले.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या संतांचा असा अवमान केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणार्‍या सुरक्षा यंत्रणा कशा काय करतात ? त्यांना संतांचा योग्य मान राखण्याचे शिकवलेले नाही का ?