मुंबई पोलीस आयुक्तांकडून राणा दांपत्याचा पोलीस ठाण्यात चहा पितांनाचा व्हिडिओ ट्वीट !

खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपांचे प्रकरण

मुंबई – ‘खार पोलिसांनी आम्हाला अटक केल्यानंतर रात्रभर पाणीही दिले नाही. पोलिसांनी अत्यंत हीन वागणूक दिली’, असा आरोप अमरावती येथील खासदार नवनीत राणा यांनी केला होता. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी याला प्रत्युत्तर देण्यासाठी पोलीस ठाण्यातील राणा दांपत्याचा चहा पितांनाचा व्हिडिओ ट्वीट केला आहे. यावर पांडे यांनी ‘आणखी काही बोलायची आवश्यकता आहे का ?’ असेही म्हटले.

भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी या व्हिडिओची फॉरेन्सिक चौकशी करण्याची मागणी केली आहे. मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ‘‘या व्हिडिओमुळे नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपांविषयीचे सत्य समोर आले आहे. केवळ महाविकास आघाडी सरकार आणि मुंबई पोलीस यांची अपकीर्ती करण्यासाठी नवनीत राणांनी असे आरोप केले होते, हे आता स्पष्ट झाले आहे.’’

राणा यांचे अधिवक्त्याच्या माध्यमातून स्पष्टीकरण !

राणा यांचे अधिवक्ता रिझवान मर्चंट यांनी यानंतर एक व्हिडिओ प्रसारित केला असून त्यात म्हटले आहे, ‘‘माझ्या अशिलाच्या विनंतीनंतर हा व्हिडिओ सिद्ध केला असून त्यांच्या वतीने ही वक्तव्ये करत आहे. राणा यांना अटक केल्यानंतर खार पोलीस ठाण्यात असतांनाचा व्हिडिओ संजय पांडे यांनी ट्वीट केला आहे. तेथील अधिकाऱ्यांनी चहासाठी विचारले होते. त्यामुळे त्यांच्याविषयी काहीही म्हणणे नाही. रात्री १ नंतर त्यांना सांताक्रूझमधील कारागृहात पाठवण्यात आले. तेथे रात्रभर आणि नंतर न्यायालयात उपस्थित करेपर्यंत त्यांना तेथे ठेवण्यात आले होते. त्यामुळे राणा यांनी केलेले आरोप सांताक्रूझमधील कारागृहात असतांना मिळालेल्या वागणुकीविषयी आहेत.’’