भारत आणि हिंदू यांची विचारसरणी धर्मनिरपेक्ष आहे ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर
सध्या परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांची चित्रफीत प्रसारमाध्यमांवर पुष्कळ प्रमाणात प्रसारित होत आहे. त्यांनी ‘हिंदु राष्ट्रवाद आणि धर्मनिरपेक्षता’ यासंदर्भात एका चर्चेनंतर विदेशी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना परखडपणे उत्तरे दिली. या वेळी एका विदेशी पत्रकाराने ‘केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार मुसलमानविरोधी असून ते भारताला हिंदु राष्ट्राच्या दिशेने घेऊन जात आहे का ?’, असा प्रश्न विचारला. त्या वेळी ‘हिंदु राष्ट्रवाद आणि धर्मनिरपेक्षता’ यांविषयी बोलतांना परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी दिलेले उत्तर येथे देत आहोत.
भारतात धर्मनिरपेक्षता धोक्यात आलेली नसणे !
‘भारतात धर्मनिरपेक्षता धोक्यात आली आहे’, असे मला वाटत नाही. धर्मनिरपेक्षता हा कायदा किंवा घटनात्मक विश्वास नाही, तर ती भारतीय समाजाची विचारसरणी आहे. भारताची विचारसरणी सर्व धर्मांना समवेत घेऊन चालण्याची नसती, तर ती कोणताही कायदा किंवा राज्यघटना निर्माण करू शकली नसती. भारत आणि हिंदू यांची विचारसरणी मुळात धर्मनिरपेक्ष आहे. त्यामुळे भारतीय समाजाची विचारसरणी पालटण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही.
सध्या मातृभाषा बोलणाऱ्या आणि हिंदु संस्कृतीच्या मुळाशी जोडलेल्या जनतेच्या हाती शक्ती एकवटलेली असणे
आपण स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतर जे बघत आहोत, ते बहुतांश भारताच्या लोकशाहीकरणाचे परिणाम आहेत, म्हणजे आजपर्यंत राजकीय, सामाजिक आणि काही प्रमाणात आर्थिक शक्ती या आमच्या देशातील मोठ्या शहरांतील इंग्रजी बोलणाऱ्या लोकांच्या हातात एकवटल्या होत्या. आता या शक्ती दुसऱ्या प्रकारच्या लोकांच्या हातामध्ये गेल्या आहेत. ते त्यांची मातृभाषा बोलतात आणि हिंदु संस्कृतीच्या मुळांशी जोडलेले असतात.
काश्मीरचे सूत्र हे धर्माच्या दृष्टीकोनातून न पहाणे योग्य !
‘जगातील मुसलमानांची तिसरी सर्वांत मोठी लोकसंख्या भारतात रहाते. पंतप्रधान मोदी हे मुसलमानविरोधी असल्याने तुम्ही भारत आणि जगभरातील इस्लामला कसे सांभाळणार ?’, या प्रश्नाचे उत्तर देतांना परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले, ‘‘आपल्याला ठाऊक आहे कि नाही, हे मला माहिती नाही. भारतात ‘जमियत उलेमा ए हिंद’ही एक राष्ट्रीय स्तरावरील मुसलमान संघटना आहे, तिची देशात ओळख आणि पकड आहे. त्यांची नुकतीच एक वार्षिक सभा झाली होती. त्यात अतिशय उघडपणे काश्मीरमध्ये झालेल्या पालटांविषयी चर्चा झाली. त्यामुळे ‘काश्मीरचे सूत्र हे धर्माच्या दृष्टीकोनातून पाहू नये’, असे मला वाटते.
आखाती देश भारतातील परिवर्तन समजून घेत असून त्यांनी देशातील अंतर्गत गोष्टींत लक्ष न घालणे
सध्या सरकारने केलेली कृती लोकांना त्यांच्या ‘स्मार्टफोन’मध्ये लगेच कळते. आता सामाजिक लाभ वाढत आहेत, तसेच त्यांच्यात आंतरिक पालटही होत आहेत, ते पूर्वी होत नव्हते. भारतीय समाजात परंपरागत ओळखी आधीच्या तुलनेत अल्प होत आहेत. आम्ही विविध देश आणि त्यांचे विविध राजकीय पक्ष यांच्याशी नेहमी संपर्क करत असतो अन् त्यांच्याशी आमचे अतिशय पारदर्शक संबंध आहेत. विशेषत: जे ५ आखाती देश आहेत, जेथे एका विशेष पंथाचे लोक रहातात, तेही भारतातील परिवर्तन समजून घेत आहेत; पण ते आमच्या देशातील अंतर्गत गोष्टींत लक्ष घालत नाहीत. त्यामुळे ‘आमचा जगातील मुसलमान समाजाशी संघर्ष आहे किंवा होईल’, असे मला वाटत नाही.