संभाजीनगर येथे राज ठाकरे यांच्या सभेची ठरलेल्या जागीच जय्यत सिद्धता !
संभाजीनगर – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या येथील १ मे या दिवशी होणाऱ्या सभेला संभाजीनगर पोलिसांनी अद्यापही अनुमती दिलेली नाही; मात्र मनसैनिकांकडून या सभेसाठी जय्यत सिद्धता करण्यात येत आहे. या अनुषंगाने २४ एप्रिल या दिवशी येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरील व्यासपिठाची मनसैनिकांकडून विधीवत् पूजा करण्यात आली. त्यानंतर आता सभेसाठी सिद्धता करण्यात येत आहे.
पोलिसांनी पर्यायी जागेचा अधिकृत प्रस्ताव दिला नाही !
मनसेकडून राज ठाकरे यांच्या सभेसाठी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानाची मागणी करण्यात आली आहे; मात्र हे मैदान शहराच्या मधोमध, तसेच मैदानाजवळील परिसरात बऱ्यापैकी मुसलमानांची लोकसंख्या असल्याने वाहतूककोंडी आणि तणाव निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर येथील पोलिसांनी मनसेला सभेसाठी दुसऱ्या जागेचा पर्याय दिल्याचे सांगितले जात आहे; मात्र मनसेचे सुमित खांबेकर यांनी हे वृत्त फेटाळले आहे. ते म्हणाले की, पर्यायी जागेसंदर्भात पोलिसांकडून आम्हाला अधिकृत पत्र आलेले नाही, तसेच सभेसाठी अद्याप अनुमतीही देण्यात आलेली नाही. या सभेला अनुमती देण्याविषयी येथील पोलीस सकारात्मक आहेत.
राज ठाकरे यांच्या सभेनंतर आतापर्यंत कुठेही वाद झाला नाही !
राज ठाकरे यांच्या सभेनंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करून येथील वंचित बहुजन आघाडीसह ४-५ संघटनांनी सभेला विरोध केला आहे. या संदर्भात या संघटनांनी येथील पोलीस आयुक्तांकडेही पत्र दिले आहे. त्यावर ‘या संघटनांचा विरोध म्हणजे पाण्यावरील बुडबुडे आहेत’, अशी टीका खांबेकर यांनी केली. ‘आजपर्यंतच्या राज ठाकरे यांच्या सभेनंतर कुठेही दंगल झाली नाही आणि या सभेनंतरही असे काहीही होणार नाही. आम्हाला विरोध करणाऱ्या संघटनांचे अस्तित्व तरी काय आहे ?’ असा प्रश्न उपस्थित करत ‘या संघटनांनी कधी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेतली आहे का ? तशी सभा घेण्याची त्यांची क्षमता तरी आहे का ?’ असा प्रश्न उपस्थित केला.