कराची विद्यापिठात आत्मघाती स्फोटात ३ चिनी नागरिकांसह ४ जण ठार
बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने स्वीकारले दायित्व !
कराची (पाकिस्तान) – येथील कराची विद्यापिठात बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या आत्मघाती बाँबस्फोटात ३ चिनी नागरिकांसह ४ जण ठार झाले आहेत. विद्यापिठाच्या एका इमारतीजवळ हा स्फोट झाला. बुरखा घातलेल्या आत्मघाती महिलेने हा बाँबस्फोट घडवून आणल्याचे सांगण्यात आले. ठार झालेले चिनी नागरिक शिक्षकांसाठीच्या व्हॅनमधून विद्यापिठाच्या कन्फ्युशियस विभागात जात असतांना हा स्फोट झाला. बुरखा घातलेली महिला या चिनी नागरिकांच्या बसची वाट पहात होती आणि बस जवळ येताच तिने स्वत:ला उडवले. स्फोट होताच व्हॅनला आग लागली आणि त्यात ३ चिनी नागरिकांसह वाहनचालकाचा मृत्यू झाला. या घटनेचे सीसीटीव्ही चित्रीकरण समोर आले आहे. यात बुरखा घातलेली महिला स्वतःला उडवून घेतांना दिसत आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बी.एल्.ए.) या आत्मघाती स्फोटाचे दायित्व स्वीकारले आहे. या संघटनेच्या ‘मजीद ब्रिगेड’ची महिला शरी बलोच उपाख्य ब्रमश हिने हा स्फोट घडवला.