सेवेची तीव्र तळमळ असलेल्या आणि सहजतेने परिस्थिती स्वीकारणाऱ्या श्रीमती मंगला पुराणिक !
(पू.) सुश्री (कु.) रेखा काणकोणकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. नीटनेटकेपणा
अ. ‘श्रीमती पुराणिककाकू कपड्यांच्या घड्या अतिशय सुंदर घालतात. त्यांनी घडी केलेले कपडे इस्त्री केलेल्या कपड्यांप्रमाणे व्यवस्थित दिसतात. त्यांनी घडी केलेल्या कपड्यांची सर्व टोके जुळवलेली असतात आणि त्यातून सात्त्विक स्पंदने येतात.
आ. काकूंनी पलंगावर घातलेल्या चादरीवरून ‘हा काकूंचा पलंग आहे’, हे लगेच कळते. त्यांचा खणही अतिशय व्यवस्थित आणि नीटनेटका असतो.
२. प्रेमभाव
कधी स्वयंपाकघरातील कुणाला बरे वाटत नसेल, तर काकू स्वतःहून त्यांची विचारपूस करतात. कधी कुणी साधक दमलेले दिसले, तर त्या त्यांना पाणी आणून देतात आणि त्यांना म्हणतात, ‘‘तुमची काय सेवा आहे ? ती मी करते.’’ काकूंच्या समवेत सेवा करतांना सर्वांनाच आनंद मिळतो.
३. इतरांशी जुळवून घेणे
काकूंना सेवेत साहाय्यासाठी कुठल्याही वयाचा साधक जोडून दिला, तरीही काकू सर्वांशी जुळवून घेतात. त्या समवेतच्या साधकाच्या प्रकृतीनुसार त्याला सेवेतील सर्व बारकावे समजावून सांगतात आणि त्याच्याकडून परिपूर्ण सेवा करवून घेतात.
४. इतरांचा विचार करणे
काकू प्रतिदिन १५ संतांसाठी स्वयंपाक करतात. असे असूनही ‘काकूंनी कधी पुष्कळ भांडी घासायला ठेवली आहेत’, असे झाले नाही. स्वयंपाक करतांना त्या आवश्यक तेवढीच भांडी वापरतात आणि वापरलेली भांडीही पाण्याने विसळूनच घासायला ठेवतात. त्यामुळे भांडी घासणाऱ्या साधकांना अधिक त्रास होत नाही.
५. सेवेची तळमळ
अ. काकू संतांसाठी स्वयंपाक करतात, तेव्हा त्यांना सकाळी ८ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ७ असे सलग उभे राहून सेवा करावी लागते; पण तरीही काकूंचे त्याविषयी कधी गाऱ्हाणे नसते. साधिकांना उन्हाळ्यात घामामुळे किंवा उष्णतेमुळे दाह होऊन त्रास होतो. अशा वेळी व्यक्तीची चिडचिड होते; पण काकू शांत आणि स्थिर राहून सेवा करतात. त्या या वयातही त्यांच्यातील तळमळीमुळेच एवढी सेवा करू शकतात.
आ. काकूंचे डोळ्यांचे शस्त्रकर्म झाले होते. तेव्हा त्यांना प्रकाशात किंवा गॅसजवळ थांबायचे नव्हते. अशा वेळीही ‘मी कोणती सेवा करू शकते ?’, असे काकू विचारत असत.
६. साधनेचे गांभीर्य
काकूंचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न नियमित होतात. त्या सारणी लिखाण नियमित करतात. त्यांना त्यांच्या चुका लक्षात आल्या नाहीत, तर त्या समवेतच्या साधकांना त्याविषयी विचारून घेतात. त्यातून त्यांचे व्यष्टी साधनेचे गांभीर्य आणि स्वतःला पालटण्याची तळमळ लक्षात येते.
७. भाव
अ. संतांची वेगवेगळी पथ्ये असतात; पण तरीही काकू संतांच्या पथ्यानुसार स्वयंपाकाचे नियोजन करून सेवा करतात. कितीही घाई असेल किंवा अडचण असेल, तरीही त्या ती सेवा भावपूर्ण करतात.
आ. परिस्थिती कशीही असो, म्हणजे सेवा अधिक असेल किंवा त्यांना बरे वाटत नसेल, तरीही त्या अखंड भावस्थितीत असतात. ‘त्यांचे देवाशी सतत अनुसंधान चालू आहे’, असे जाणवते.
८. जाणवलेले पालट
पूर्वी काकूंना समवेतच्या साधकांकडून चुका झाल्यास पुष्कळ प्रतिक्रिया येत असत आणि त्या दीर्घकाळ त्यांच्या मनातही रहात असत. त्याविषयी व्यष्टी आढाव्याच्या माध्यमातून त्यांना जाणीव करून दिल्यावर आता त्यांच्यामध्ये पुष्कळ पालट झाला आहे. आता सहसाधकांकडून चुका झाल्यास काकू त्यांना समजून घेतात. तेव्हा ‘त्यांच्या मनात प्रतिक्रिया न येता त्या स्थिर आहेत’, असेही वाटते.’ (१२.२.२०२२)
कु. मयुरी डगवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा
‘१६.१ ते २२.१.२०२२ या कालावधीमध्ये मी आणि श्रीमती पुराणिककाकू एका खोलीत रहायला होतो. त्या वेळी मला त्यांची लक्षात आलेली काही गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. परिस्थिती स्वीकारणे
१ अ. ‘पुढे वयोमानानुसार सेवा करता आली नाही, तर अनेक घंटे नामजपच करावा लागेल’, असा विचार करून आनंदाने नामजप करणाऱ्या श्रीमती पुराणिककाकू ! : आम्हाला आध्यात्मिक उपायांसाठी अनेक घंटे नामजप करायला सांगितलेला होता. काकू त्यांना सांगितलेला नामजप न कंटाळता करायच्या. एकदा मी त्यांना विचारले, ‘‘काकू, तुम्हाला कंटाळा आला नाही का ?’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘नाही. माझे वय झालेले असल्याने आता याची सवय करायला हवी. पुढे शरीर साथ देणार नाही. त्या वेळी मला सेवाही करता येणार नाही. तेव्हा सगळे आपापल्या सेवेत व्यस्त असतील. अशा वेळी मला एकटेही रहावे लागेल. त्यामुळे परिस्थिती स्वीकारून त्याची आतापासून सवय करायला हवी.’’
१ आ. ऐकायला येणे न्यून झाल्याचे स्वीकारणे : अलीकडे त्यांना ऐकू येणे न्यून झाले आहे. त्याविषयी त्यांचे गाऱ्हाणे नसते. त्यांनी ते स्वीकारले आहे. त्यातही त्या आनंदी असतात.
२. परेच्छेने वागणे
त्यांना काहीही सांगितले, तरी त्या लगेच त्यानुसार कृती करायच्या. त्या परेच्छेने वागायच्या.
३. भाव
खोलीत भजने लावल्यावर किंवा प.पू. गुरुदेवांविषयी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी) बोलल्यावर किंवा नामजप करतांनाही त्यांची भावजागृती व्हायची.
४. जाणवलेला पालट !
अ. काकूंची ‘त्यांना कोणी काही सांगावे किंवा विचारावे’, अशी अपेक्षा नव्हती. काकूंच्या अपेक्षा आधीपेक्षा न्यून झाल्या आहेत.
आ. काकू आता आनंदी दिसत आहेत. त्यांच्या मनाची निरागसता वाढली आहे. एकदा त्यांचा वाढदिवस होता; म्हणून पू. रेखाताईंनी (पू. रेखा काणकोणकर यांनी) त्यांच्यासाठी खीर पाठवली होती आणि आरतीताईंनी (काकूंची सून सौ. आरती पुराणिक यांनी) त्यांना शुभेच्छा पत्र पाठवले. तेव्हा त्या लहान मुलासारख्या आनंदी झाल्या. त्यांच्यामुळे मलाही आनंद मिळत होता.
५. अनुभूती
एक दिवस मला त्रास होत होता. त्या वेळी त्यांच्या पलंगाकडे बघून मला शांत वाटले आणि आनंद जाणवला. त्यानंतर माझा त्रास न्यून झाला आणि मला चांगले वाटायला लागले.’ (१२.२.२०२२)
सौ. रूपाली पाटील, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. प्रेमळ
‘श्रीमती पुराणिककाकूंचा स्वभाव पुष्कळ प्रेमळ आहे. काकूंशी बोलतांना ‘त्यांचे आणि माझे फार पूर्वीपासूनचे नाते आहे’, असे मला वाटते.
२. भाव
श्रीमती पुराणिककाकू वयस्कर असूनही सर्व संतांचा स्वयंपाक त्यांच्या पथ्यानुसार आणि भावपूर्णपणे करतात. सर्व संतांचा स्वयंपाक थोडा थोडाच करायचा असतो. काकू तो स्वयंपाक नामजप करत भावपूर्ण करतात.
३. स्वयंपाकाचा अंदाज योग्य असणे
त्यांचे निरीक्षण पुष्कळ चांगले आहे. त्यांनी संतांसाठी केलेला स्वयंपाक कधीही अल्प-अधिक होत नाही.’ (११.१०.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |