श्रीमती मंगला पुराणिक आणि श्रीमती मंदाकिनी चौधरी यांच्या सत्कार सोहळ्यात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी केलेले मार्गदर्शन !
श्रीमती मंगला पुराणिक (वय ७० वर्षे) आणि श्रीमती मंदाकिनी चौधरी (वय ८५ वर्षे) यांच्या सत्कार सोहळ्यात साधनेत येणाऱ्या चढ-उतारांकडे सकारात्मकतेने पहाणे अन् आनंद मिळवण्यासाठी अडथळ्यांवर मात करणे यांविषयी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी केलेले मार्गदर्शन !
रामनाथी (गोवा) – येथील सनातनच्या आश्रमातील अन्नपूर्णाकक्षात सेवा करणाऱ्या प्रेमळ, उत्साही आणि शरणागतभाव असलेल्या श्रीमती मंगला पुराणिक यांनी ६२ टक्के, तर विविध ओव्यांची रचना करून परात्पर गुरुदेवांप्रती अपार भाव व्यक्त करणाऱ्या अन् कृतज्ञतेने सदैव गुरुचरणी लीन असणाऱ्या श्रीमती मंदाकिनी चौधरी (सनातनच्या संत पू. (सौ.) संगीता जाधव यांच्या आई) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. ही आनंदवार्ता परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी १५ मार्च २०२२ या दिवशी ‘गुरुगाथा सत्संगा’त केली. या सत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे.
१. साधनेत येणाऱ्या चढ-उतारांकडे सकारात्मकतेने आणि शिकण्याच्या वृत्तीने पाहून गतीने पुढे जायला हवे !
श्रीमती पुराणिककाकू काही कारणांनी साधनेत काही पावले मागे गेल्या होत्या; पण पुन्हा गुरुचरणांचे ध्येय गाठण्यासाठी त्यांनी प्रत्येक अडथळ्यावर चिकाटीने प्रयत्न करून मात केली. स्वत:ला पालटण्यासाठी गुरूंच्या म्हणजेच उत्तरदायी साधकांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आज्ञापालन म्हणून साधनेतील सूत्रे कृतीत आणली. त्यामुळे देव त्यांची प्रगती करवून घेत आहे. साधना करत असतांना आपल्या जीवनात घडणारा प्रत्येक प्रसंग मनोलयाकडे घेऊन जात असतो; मात्र प्रसंगांकडे बहिर्मुखतेने पाहून आपण मनोलयाची प्रक्रिया टाळतो. साधना करतांना घडणारे प्रसंग साधकाच्या साधनेसाठी ईश्वरेच्छेने घडत असतात. अंतर्मुख राहून प्रसंगातून गुरुदेव आपल्याला साधनेच्या दृष्टीने काय शिकवत आहेत, याचे चिंतन करायला हवे. आपण जसा भाव ठेवू, तसे श्रीगुरूंचे तत्त्व आपल्या साहाय्यासाठी कार्यरत होते.
साधनेच्या प्रवासामध्ये चढ-उतार होतच असतात; पण आनंद आणि दु:ख या दोन्ही स्थितींमध्ये सकारात्मक अन् स्थिर राहिल्याने आपल्या मनाची जडणघडण होत असते. तसेच धनुष्यातून बाण सोडण्यापूर्वी धनुष्याची दोरी मागे खेचली की, बाण योग्य निशाणापर्यंत पोचू शकतो. तसे काही कारणाने प्रयत्न अल्प झाले, साधनेत काही पावले मागे आलो, तरी खचून न जाता साधनेचे पुढील प्रयत्न जोमाने करावे.
२. ‘शिष्याचे जीवन आनंदी असणे’, यातच गुरूंचा आनंद असतो !
‘गुरुविना शिष्य नाही आणि शिष्याविना गुरु नाही’, अशी एक म्हण आहे. ‘शिष्याचे जीवन आनंदी असणे’, यातच गुरूंचा आनंद असतो. प.पू. गुरुदेवांचेही तसेच आहे. ‘साधकांचा त्रास न्यून होण्यासाठी आणखी काय करता येईल ? साधकांना आनंद मिळण्यासाठी आणखी काय करता येईल ?’, याचा विचार ते सतत करत असतात. आज आपण सर्वजण जे साधनेचे प्रयत्न करत आहोत, त्यातून आपल्याला जो आनंद प्राप्त होत आहे, तो केवळ आणि केवळ प.पू. गुरुदेवांच्या कृपाशीर्वादामुळेच आहे !
३. रज-तम प्रधान वातावरणातही साधकांची तळमळीने काळजी घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविना कोण आहे ?
गुरुदेवांचा प्रत्येक श्वास हा साधकांसाठीच असतो. त्यांना प्रत्येक क्षणी साधक आणि साधकच डोळ्यांसमोर दिसतात. गुरूंचा प्रत्येक दिवस आणि प्रत्येक विचार हा त्यांच्या साधकांसाठीच असतो. ‘आज साधकांसाठी काय करू ?’, ‘समष्टीसाठी काय देऊ ?’, अशीच त्यांची तळमळ असते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अपार कृपेमुळे आणि त्यांच्या प्रीतीमुळेच साधकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र पालट होत आहेत. साधकांचे जीवन आनंदी होऊन ते या घोर कलियुगात रज-तम वातावरणात रहात असूनही मोकळा श्वास घेत आहेत. सनातनचा प्रत्येक साधक आणि त्यांचे कुटुंब यांचीही ते काळजी घेत आहेत. अशी काळजी घेणारे या पृथ्वीवर दुसरे कोण आहे ?
४. श्रीमती मंदाकिनी चौधरीआजींमध्ये आंतरिक साधना, तळमळ आणि भाव असणे
श्रीमती मंदाकिनी चौधरीआजींकडून सर्वच साधकांनी शिकणे आवश्यक आहे. वयस्कर असतांनाही कोणत्याही प्रकारची सवलत न घेता त्या आश्रमातील कार्यपद्धतींचे पालन करतात. त्या अन्य संप्रदायानुसार साधना करत असतांनाही त्यांनी सनातन संस्था सांगत असलेल्या साधनेतील मर्म लक्षात घेऊन साधना आत्मसात केली. गुरूंनी सांगितलेली साधना आत्मोद्धाराची आहे.
५. परात्पर गुरुदेवांनी साधकांना प्रत्येक गोष्टीतून आनंद देणे
आश्रमात राहून साधना करत असतांना आपल्यामध्ये आपलेपणा किंवा सहजता असायला हवी. भगवंत गुणांची खाण आहे; पण आपण ते ओळखू शकत नाही; म्हणून तोच ते दैवी गुण आपल्यासमोर उलगडत असतो. भगवंत आपल्यासमोर उलगडत असलेले हे ज्ञान आणि त्याच्यातील दैवी गुण स्वत:मध्ये आत्मसात करूया. शिष्याच्या प्रगतीत गुरूंना आनंद आहे. गुरूंना ‘साधकांना किती देऊ’, असे वाटत असते. परात्पर गुरुदेव त्यांच्या उच्च आध्यात्मिक स्थितीला असूनही साधकांना प्रत्येक गोष्टीतून आनंद देत असतात.
६. साधना म्हणजेच आनंद आणि तो मिळवण्यासाठी येणाऱ्या अडथळ्यांवर मात करायला हवी !
देवाने निर्माण केलेल्या विश्वामध्ये प्रत्येक गोष्ट शिकण्यासारखी आहे. आपली शिकण्याची स्थिती अल्प असेल, तर साधनेच्या एका टप्प्यावर निरुत्साह येऊ शकतो. त्यामुळे साधकाने सतत शिकण्याच्या स्थितीत राहिले पाहिजे. सतत शिकणे म्हणजेच सतत आनंदी रहाणे ! परात्पर गुरुदेव छोट्या छोट्या गोष्टी शिकून त्यातून आनंद घेतात, तसा आनंद आपण घेण्याचा प्रयत्न करायला हवा. साधना म्हणजेच आनंद ! तो अनुभवण्यासाठी साधनेत येणाऱ्या अडथळ्यांवर चिकाटीने मात करतो, तो खरा साधक ! या भूतलावर असे व्हायला हवे की, ‘जेथे सनातनचे साधक तेथे आनंद !
७. कोणतीही सेवा ही देवपूजेच्या भावानेच करायला हवी !
आपल्याला कोणतीही सेवा दिली, तरी ती देवपूजेच्या भावानेच करायला हवी. ज्याप्रमाणे देवपूजा करतांना भाव असतो, तसाच भाव आपण सेवा करतांना ठेवू शकतो. सत्संगाच्या वेळी देवी-देवता आणि ऋषि-मुनी येत असल्याने आपण तेथे वेळेत उपस्थित रहातो का ?, याचे साधकांनी अवलोकन करावे. आपण कोणतीही सेवा करत असो, मग ती दुरुस्ती सेवा असो, स्वयंपाक करण्याची सेवा असो, संगणकीय सेवा असो वा प्रसार सेवा असो आपण ती देवपूजा या भावानेच करायला हवी. ‘प्रत्येक सेवेत साक्षात् भगवंत आहे’, असा भाव ठेवल्यास सेवेची पूर्ण फलनिष्पत्ती मिळते ! सेवा करत असतांना मन किंवा लक्ष दुसरीकडे असले, तरी आपण मनाला प्रयत्नपूर्वक गुरुचरणी आणायला हवे.
८. आपल्यासह असलेल्या साधकांच्या चुका सांगून परिपूर्ण सेवा करण्याचा संस्कार होणे महत्त्वाचे !
आपण समष्टीत सेवा करत असल्याने प्रत्येक साधकाला सहसाधकांच्या किंवा अन्य साधकांच्या चुका लक्षात येत असतात; पण आपण त्या संबंधितांना ‘साधकांना शिकवत तर नाही ना ?’, ‘त्या साधकाला माझ्याविषयी काय वाटेल ?’, अशा प्रतिमेच्या विचारांमुळे सांगत नाही. खरेतर साधकांनी उत्तरदायी साधकांचे साहाय्य घेऊन चुका सांगायला हव्यात. आपल्याला परिपूर्ण कृती करून साधना करायची आहे. साधकाच्या मनावर परिपूर्ण सेवा करण्याचा संस्कार झाला की, त्याचा साधनेतील वेळ वाया जात नाही. आपण स्वतःसह सहसाधकांच्या साधनेचेही दायित्व घेऊन त्यांना साधनेत साहाय्य करायला हवे.