लांजा (रत्नागिरी) येथे मुख्याध्यापकाचा ६ वीतील विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार

लांजा (रत्नागिरी) – तालुक्यातील गवाणे येथील जिल्हा परिषदेची केंद्र शाळा नं. १ मधील मुख्याध्यापक सोनावणे याने ६ वीत शिकणार्‍या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना २३ एप्रिल या दिवशी उघड झाली. येथील पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकाच्या विरोधात ‘पोक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पीडित मुलीला झालेल्या अत्याचाराविषयी मोठा मानसिक धक्का बसला असल्याने तिला सातत्याने चक्कर येत होती. याविषयी पालकांनी तिला विश्‍वासात घेऊन विचारल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार पालकांना सांगितला.

ग्रामस्थांची आंदोलन करण्याची चेतावणी

अत्याचार झाल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने मुख्याध्यापकाच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी भा.दं.वि. कलम ३५४, तसेच बाल लैंगिक अत्याचार (पॉक्सो) अंतर्गत गुन्हा नोंद केला.

याविषयी गवाणे गावातील ग्रामस्थांनी शिक्षण विभागाकडेही तक्रार केली असून ‘आरोपीवर कठोर कारवाई करावी’, अशी मागणी केली आहे. ‘मुख्याध्यापकावर कठोर कारवाई न झाल्यास गवाणे येथील जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करेल’, अशी चेतावणी येथील प्रतिष्ठित नागरिक श्री. सुरेश करंबेळे यांनी दिली.

संपादकीय भूमिका

शिक्षकी पेशाला काळीमा फासणार्‍या अशा मुख्याध्यापकांना कठोर शिक्षा हवी !