डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि सचिन अंदुरे यांची निर्दाेष मुक्तता करावी, यासाठी प्रविष्ट केलेले आवेदन न्यायालयाने फेटाळले !
कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण
कोल्हापूर, २५ एप्रिल (वार्ता.) – कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि सचिन अंदुरे यांची निर्दाेष मुक्तता करावी यासाठी दोघांच्या वतीने कोल्हापूर येथे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश बी.डी. शेळके यांच्या न्यायालयात आवेदन प्रविष्ट करण्यात आले होते. या प्रकरणी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीर आणि अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी युक्तिवाद केला होता, तसेच सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अधिवक्ता हर्षद निंबाळकर यांनी युक्तिवाद केला होता. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून न्यायाधिशांनी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि सचिन अंदुरे यांची निर्दाेष मुक्तता करावी, यासाठी प्रविष्ट केलेले आवेदन फेटाळले आहे. यापुढील सुनावणी १६ मे या दिवशी होणार आहे.
कॉ. पानसरे हत्या प्रकरणात पोलिसांनी ३ वेगवगळ्या ‘थिअरी’ मांडल्या आहेत. सर्वात आधी पोलिसांचा असा दावा होता की, कॉ. पानसरे यांच्या घरासमोरच्या चिंचोळ्या रस्त्यावरती गाडीवरून आलेल्या दोन जणांनी कॉ. पानसरे दांपत्यावर गोळ्या चालवल्या. त्यातील गोळ्या झाडणारा एक संशयित म्हणून पोलिसांनी समीर गायकवाड यांना अटक केली. त्याच्यासमवेत अन्य आरोपी कोण होता ? ते अज्ञाप अज्ञात आहे. पुढच्या अन्वेषणात पोलिसांनी मुख्य संशयित; म्हणून डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक केल्यावर पोलिसांनी या प्रकरणी सारंग अकोलकर आणि विनय पवार हे दोघे आरोपी असल्याचे सांगितले, तर पुढच्या अन्वेषणात वासुदेव सूर्यवंशी गाडी चालवणारा आणि सचिन अंदुरे यांनी गोळ्या झाडल्या म्हणून त्यांना अटक केली. त्यामुळे कॉ. गोविंद पानसरे प्रकरणात नेमके हल्लेखोर कोण ? हेच निश्चित नसल्याने कॉ. पानसरे हत्या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि सचिन अंदुरे यांची निर्दाेष मुक्तता करावी, असा युक्तिवाद अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केला होता.