फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा विजय !

पॅरिस (फ्रान्स) – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये विजय झाला असून ते सलग दुसर्‍यांदा फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. मॅक्रॉन यांनी मरीन ली पेन यांना मोठ्या फरकाने पराभूत केले. मॅक्रॉन यांना ५८ टक्के मते मिळाली, तर पेन यांना ४२ टक्के मते मिळाली. पेन यांनी पराभव स्वीकारला असून त्यांनी मॅक्रॉन यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

‘निवडणुकीमध्ये मॅक्रॉन यांची कामगिरीच एखाद्या मोठ्या विजयासारखी आहे’, असे त्या म्हणाल्या. मॅक्रॉन पहिल्यांदा पंतप्रधान झाले, तेव्हाही त्यांनी मरीन ली पेन यांनाच पराभूत केले होते. उजव्या विचारसरणीच्या मरीन ली पेन यांनी तिसर्‍यांदा राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढली होती.

मॅक्रॉन यांनी कोरोना कालावधीत केलेले काम, युक्रेन युद्धासंदर्भातील भूमिका आणि जागतिक स्तरावरील संघटनांसमवेत ठेवलेले संबंध या सर्व गोष्टींच्या आधारे त्यांच्या बाजूने मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

येणारी काही वर्षे नक्कीच कठीण असतील ! – मॅक्रॉन

मॅक्रॉन यांनी विजयाविषयी म्हटले की, मला एक निष्पक्ष समाज हवा आहे. असा समाज जिथे महिला आणि पुरुष यांच्यामध्ये समानता असेल. येणारी काही वर्षे नक्कीच कठीण असतील; मात्र ती ऐतिहासिक असतील. नवीन पिढ्यांसाठी आपल्याला एकत्र येऊन काम करावे लागणार आहे.

पंतप्रधान मोदी यांच्याकडून मॅक्रॉन यांचे अभिनंदन !

पंतप्रधान मोदी यांनी मॅक्रॉन यांचे अभिनंदन करणारे ट्वीट केले आहे. त्यांनी म्हटले की, माझे मित्र इमॅन्युएल मॅक्रॉन यांची फ्रान्सच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन ! भारत-फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी मी तुमच्यासमवेत एकत्र काम करत रहाण्यासाठी फार उत्सुक आहे.