हिंदुत्वाची मशाल प्रत्येक हिंदूच्या मनात प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करू ! – धर्मप्रेमींचा निश्चय
पिंगुळी, कुडाळ येथे आयोजित हिंदूसंघटक कार्यशाळेची सांगता
कुडाळ – हिंदु जनजागृती समितीचे कार्य अतिशय प्रेरणादायी आहे. समितीने आयोजित केलेल्या कार्यशाळेने आम्हाला सात्त्विकता आणि संस्कार दिले, तसेच ईश्वरभक्ती शिकवली. देश आणि धर्म यांवरील आघातांची माहिती दिली. महत्त्वाचे म्हणजे धर्मांधता नव्हे, तर धर्माभिमान आणि धर्माकडे डोळसपणे बघण्याची दृष्टी अन् हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीची प्रेरणा दिली. ही कार्यशाळा म्हणजे हिंदुत्वाचे एक धगधगते अग्नीकुंड असून या अग्नीकुंडातून आमच्या मनात प्रज्वलित झालेल्या हिंदुत्वाच्या मशालीने आम्ही पुढील काळात आपापल्या भागातील हिंदूंच्या मनात हिंदुत्वाच्या मशाली प्रज्वलीत करू, असा दृढ निश्चय पिंगुळी येथे आयोजित हिंदूसंघटक कार्यशाळेत सहभागी झालेल्या धर्माभिमानी हिंदूंनी व्यक्त केला.
तालुक्यातील पिंगुळी येथील प.पू. राऊळ महाराज समाधी मंदिराच्या सभागृहात २३ आणि २४ एप्रिल असे २ दिवस हिंदु जनजागृती समितीने या कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत गोवा राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्हा येथील एकूण ११० धर्मप्रेमींनी सहभाग घेतला. या वेळी सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, सद्गुरु सत्यवान कदम, आणि हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांच्यासह अन्य वक्त्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
लोकशाहीचे अपयश समाजासमोर अभ्यासपूर्ण मांडा ! – सद्गुरु सुश्री (कु.) स्वाती खाडये
लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा या विषयासंदर्भात सद्गुरु सुश्री(कु.) स्वातीताई आणि सौ. शुभा सावंत यांनी मार्गदर्शन केले. सद्गुरु स्वाती खाडये म्हणाल्या, ‘‘शिक्षण, आरोग्य, कायदा या सर्वच क्षेत्रांत विद्यमान धर्मनिरपेक्ष लोकशाही अपयशी ठरली आहे. या अपयशी लोकशाहीच्या विरोधात लढा देण्यासाठी सनातनच्या नियतकालिकांचा अभ्यास करा.’’
हिंदूसंघटनाच्या कार्याचा झंझावात निर्माण करा ! – श्री. मनोज खाडये
या वेळी श्री. मनोज खाडये यांनी सुराज्य अभियानच्या मोहिमांमधून हिंदु राष्ट्राची पायाभरणी होईल. त्यासाठी हिंदूसंघटक कार्यशाळेतून प्रेरणा घेऊन हिंदूसंघटनाच्या कार्याचा झंझावात निर्माण करा, असे आवाहन केले.
‘अनिष्ट शक्तींच्या त्रासाच्या निवारणार्थ करावयाचे उपाय’ या विषयावर सदगुरू सुश्री स्वाती खाडये आणि कु. अनुराधा जाधव यांनी मार्गदर्शन केले. रत्नागिरी येथील श्री. संजय जोशी यांनी समितीच्या सुराज्य अभियानची माहिती आणि आतापर्यंत केलेल्या कार्याची माहिती दिली. हिंदु राष्ट्र संघटकांची आचारसंहिता या विषयावर श्री. शरद राऊळ यांनी, तर स्वभावदोष आणि अहं निर्मूलन याविषयी गोवा येथील श्री. सम्राट देशपांडे आणि श्री संगम बोरकर यांनी मार्गदर्शन केले. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’चे जीवनातील महत्त्व’, याविषयी श्री. गोविंद चोडणकर आणि श्री. मनोज खाड्ये यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत काही प्रायोगिक भाग घेण्यात आले. यामध्ये लव्ह-जिहाद, हिंदु राष्ट्राची आवश्यकता, हलाल प्रमाणपत्र आदी विषय धर्मप्रेमींनी मांडले. गोवा येथील विश्वास प्रभु, सौ. श्वेता नाईक, सौ. सोनम शिरोडकर, सिंधुदुर्ग येथील श्री. मोहन पाटील, डॉ. दत्तप्रसाद प्रभू, डॉ. संजय चव्हाण आदींनी यात सहभाग घेतला.
जे शिकलो, ते कृतीत आणणे हीच कार्यशाळेची फलनिष्पत्ती !
कार्यशाळेच्या समारोपात ‘आगामी कार्याची दिशा’ यावर सद्गुरु सत्यवान कदम आणि सद्गुरु स्वाती खाड्ये यांनी उद्बोधक असे मार्गदर्शन केले. या वेळी संतद्वयींनी सांगितले की, कार्यशाळेच्या निमित्ताने जे आपण शिकलो, ते आता कृतीत आणण्यासाठी प्रयत्न करा. हीच या कार्यशाळेची फलनिष्पत्ती ठरेल. यानंतर आपल्या हिंदु राष्ट्राच्या कार्याला वैचारिक दिशा देऊ शकलो, तर याची फलनिष्पत्ती अधिकच वाढणार आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य ही समष्टी साधना आहे. हे कार्य करत असतांना आपण साधना केली, तरच देव आपल्याला साहाय्य करणार आहे.
कार्यक्रमाची सांगता कु. राखी पांगम यांनी म्हटलेल्या संपूर्ण वन्दे मातरम् या राष्ट्रीय गीताने करण्यात आली.
श्री. प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज सेवा ट्रस्टचे कार्यशाळेच्या आयोजनासाठी सहकार्य
प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज सेवा ट्रस्टने हिंदूसंघटक कार्यशाळेसाठी विनामूल्य सभागृह, निवासासाठी खोल्या उपलब्ध करून दिल्या, तसेच भोजनव्यवस्था केली. येथील आश्रमाच्या इमारतीचे चालू असलेले डागडुजीचे काम हिंदूसंघटक कार्यशाळेत अडथळे येऊ नयेत, यासाठी दोन्ही दिवस बंद ठेवण्यात आले होते. कार्यशाळेत व्यत्यय येऊ नये, यासाठी नियमितची आरती आणि घंटानाद मोठ्याने न करता हळू आवाजात म्हणण्यात आली.
कार्यक्रमाच्या समारोपानंतर प.पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांचे सुपुत्र श्री. दशरथ राऊळ कार्यक्रमस्थळी आल्यावर म्हणाले, ‘‘प.पू. राऊळ महाराज समाधी मंदिराच्या अन्नछत्राच्या ठिकाणी कार्यशाळा झाली, तरीही मला आपल्या या कार्यक्रमामुळे मंदिरात आल्याचा अनुभव आला.’’
प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज सेवा ट्रस्टचे कार्याध्यक्ष तथा प.पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांचे सुपुत्र श्री. विठोबा राऊळ यांनी कार्यक्रमस्थळी आवर्जून भेट दिली. ‘या कार्यक्रमामुळे आश्रम परिसराची एक प्रकारे शुद्धीच झाली आहे’, असे त्यांनी कृतज्ञतापूर्वक सांगितले.
आभार : कुडाळ येथील ‘सरसोलीधाम’ यांनी धर्मप्रेमींसाठी विनामूल्य निवासव्यवस्था उपलब्ध करून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. कृपाली भुवड आणि कु. वैष्णवी मिसाळ यांनी केले.
क्षणचित्रे
१. हिंदूसंघटक कार्यशाळेमध्ये घेण्यात आलेल्या प्रायोगिक भागात धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
२. धर्मप्रेमींच्या उत्स्फूर्त घोषणांनी सर्वांचा उत्साह वाढला.
३. शेवटच्या सत्रात काही धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे मनोगत व्यक्त केले.
४. संतांच्या आवाहनानंतर धर्मकार्यासाठी प्रतिदिन २ घंटे वेळ देण्याचा निर्धार धर्मप्रेमींनी केला.
धर्मप्रेमींनी व्यक्त केलेले मनोगत
१. हलाल उत्पादने विकणार नाही ! – सौ. सुरेखा पाटील, होंडा, सांखळी, गोवा
सौ. सुरेखा पाटील माझे दुकान आहे. या कार्यशाळेतून गेल्यावर त्वरित माझ्या दुकानातील हलाल प्रमाणित उत्पादने मी बाजूला काढीन आणि यापुढे ती विकणार नाही, असा निश्चय केला. त्यांनी ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’ याविषयी स्वतःचे विचार पुढील काव्यपक्तींमधून मांडले.
मला हिंदु राष्ट्र का हवे आहे ? जिहाद संपवण्यासाठी !
मला हिंदु राष्ट्र का हवे आहे ? आपला धर्म वाचवण्यासाठी !
मला हिंदु राष्ट्र का हवे आहे ? आपला देश, समाज वाचवण्यासाठी !
मला हिंदु राष्ट्र्र का हवे आहे ? भारतमातेचे विभाजन थांबवण्यासाठी !
मला हिंदु राष्ट्र्र का हवे आहे ? आपली जैविक संपत्ती वाचवण्यासाठी !
मला हिंदु राष्ट्र्र का हवे आहे ? गुरु-शिष्य परंपरा टिकवण्यासाठी !
मला हिंदु राष्ट्र्र का हवे आहे ? मातृ-पितृऋण फेडण्यासाठी !
मला हिंदु राष्ट्र्र का हवे आहे ? आपली संस्कृती टिकवण्यासाठी !
मला हिंदु राष्ट्र्र का हवे आहे ? गोमाता वाचवण्यासाठी !
२. हिंदुत्वाचे एक धगधगते अग्नीकुंड ! – अधिवक्ता श्री. पलाश चव्हाण, मालवण, सिंधुदुर्ग.
कार्यशाळेच्या सर्व आयोजकांचे आभार मानतांना माझे शब्द अपुरे पडत आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी नतमस्तक होतो. संत प.पू. राऊळ महाराज यांच्या चरणी लीन होतो. ही कार्यशाळा म्हणजे हिंदुत्वाचे एक धगधगते अग्नीकुंड आहे. या धगधगत्या अग्नीकुंडात प्रत्येक व्यक्तीने हिंदुत्वाची मशाल पेटवून घेतलेली आहे आणि तो प्रत्येक जण आपापल्या भागात या मशालीने इतरांच्या मनातील हिंदुत्वाच्या मशाली प्रज्वलित करणार आहेत.
या कार्यशाळेने मला सात्विकता, संस्कार दिले. ईश्वरभक्ती शिकवली. ‘धर्मांधता नव्हे, तर धर्माकडे डोळसपणे’ बघण्याची वृत्ती दिली. येथे ‘शिवशाही आणि रामराज्य’ यांचे दर्शन घडले. स्वतः समवेत इतरांचा विचार करायला शिकलो. कार्यशाळेत एक सुंदर कुटुंब भेटले.
धर्मकार्याच्या तळमळीने प्रतिकूल परिस्थितीतही कार्यशाळेला उपस्थित राहिलेल्या गोवा येथील सौ. सोनम शिरोडकर !
गोवा येथील सौ. सोनम शिरोडकर यांना ३ मुली आहेत. यांपैकी एका मुलीच्या डोक्याला झालेल्या जखमा चिघळल्या होत्या, तर दुसर्या मुलीच्या अंगावर गरम पाणी पडून ती भाजली होती. त्यामुळे त्यांना कार्यशाळेला येणे कठीण होते. याविषयी सद्गुरु सत्यवान कदम यांना समजल्यावर त्यांनी सौ. शिरोडकर यांना नामजपादी उपाय सांगितले. हे उपाय केल्यानंतर सौ. शिरोडकर यांच्या मुलींना होणारे त्रास अल्प झाल्याची अनुभूती त्यांनी घेतली. त्यामुळे त्यांनी मुलींना स्वत:च्या आईकडे ठेवले अन् कार्यशाळेत दोन्ही दिवस सहभागी झाल्या. ‘अडचणींवर मात करून ईश्वरी कार्यात कसे सहभागी व्हावे’, याचा आदर्श सौ. शिरोडकर यांनी सर्वांसमोर निर्माण केला.
धर्मप्रेमींचे मनोगत
१. श्री. आकाश माने, सिंधुदुर्ग – हिंदूंमध्ये धर्मप्रेम नाही. त्यामुळे धर्माची दुरवस्था झाली आहे . आता यापुढे मी धर्मासाठी काय करणार आहोत, याचा निश्चय करूया. आपण हिंदु धर्माचा प्रसार करण्यासाठी मागे का पडतो ?, याचा विचार करूया. यापुढे मी माझ्या व्यवसायाच्या ठिकाणी ‘हलाल प्रमाणित’ कोणतीही वस्तू मिळत नाही’, असा फलक लावणार आहे. मी लोकांचे हलाल प्रमाणपत्राविषयी प्रबोधन करीन.
२. श्री. दत्तात्रय आमोणकर, गोवा – हिंदु राष्ट्राच्या स्थापना कार्यासाठी तन, मन, धन अर्पण करत असतांना केवळ २ घंटे नको, तर त्याहून अधिक वेळ देण्याचा प्रयत्न करूया. मी विविध प्रसंगी हस्तपत्रक प्रायोजित करून ती वितरित करीन. धर्मशिक्षण वर्ग आयोजित करीन.
३. सौ. अनघा पंडित, सिंधुदुर्ग – या कार्यशाळेच्या निमित्ताने मला हिंदु जनजागृती समितीचे कार्य समजले. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी काय करायला हवे, हे समजले. शिकण्याची वृत्ती ठेवली, तर प्रगती होईल, हे समजले.
अभिप्राय
१. श्री. दिगंबर जामदार, गोवा – हिंदु जनजागृती समितीचे कार्य अतिशय प्रेरणादायी आहे. प्रत्येकाने तन, मन, धन यांचा त्याग करून या कार्यात सहभागी व्हायला हवे. मला हे कार्य विलंबाने समजले. मी समितीच्या संपर्कात आल्यापासून माझ्या उपलब्ध वेळेनुसार या कार्यात तळमळीने सहभागी होत आहे. या कार्यशाळेत धर्मकार्यासाठी पुष्कळ उत्साह आणि प्रेरणा मिळाली. हे सर्व कार्य ईश्वरच्छेने होत आहे. यापुढे मी साधना म्हणून अधिकाधिक वेळ देऊन या कार्यात झोकून देऊन सहभागी होईन.
२. श्री. उदय चंद्रकांत नाईक, परमे, दोडामार्ग, सिंधुदुर्ग. – सध्याच्या काळात ‘धर्म’ जाणून घेऊन त्यासाठी ‘आध्यात्मिक राष्ट्रवादी’ नितीचा अवलंब करावाच लागेल.