राजकारण्यांचा ‘धंदा’ !
देहलीतील ‘महाराष्ट्र सदन’मधील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणी २६ मास कारागृहात राहिल्यानंतर न्यायालयाकडून निर्दोष मुक्त झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विद्यमान मंत्री छगन भुजबळ यांनी हिंदु पुजाऱ्यांविषयी अपशब्द काढले आहेत. भुजबळ यांनी म्हटले, ‘सुतारकाम करणे हा सुताराचा धंदा आहे, चर्मकाराचा चप्पल विकणे हा धंदा आहे. तो त्यांचा धर्म नाही. त्याचप्रकारे पूजा करणे, हा पुजाऱ्यांचा धर्म नसून धंदा आहे; मात्र पुजारीच आता वेगवेगळ्या धंद्यांत उतरले आहेत. त्यामुळे देवळात १०० टक्के आरक्षण यांचेच कसे ?’ या त्यांच्या विधानावर टीका होणे स्वाभाविक आहे. छगन भुजबळ जेव्हा शिवसेनेत होते, तेव्हा ते हिंदुत्वाचा झेंडा हातात घेऊन लढत होते. शिवसेनेतून बाहेर पडतांना त्यांनी जातीपातीचा आधार घेत शिवसेनेवर टीका केली होती आणि तत्कालीन सरकारमध्ये मंत्रीपद मिळवले होते. यावरून राजकारण्यांचा धर्म कोणता आणि धंदा कोणता, हे वेगळे सांगावे लागू नये ! हे भुजबळ जातीचे राजकारण करून देशात ‘समता’ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जेव्हा भुजबळ शिवसेनेत होते, तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘रिडल्स ऑफ हिंदुइझम्’ या पुस्तकातील हिंदूंच्या देवतांविषयी अश्लाघ्य लिखाणाच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन चालू होते. त्या वेळी शिवसेनेला विरोध करतांना मुंबईतील हुतात्मा चौकात दलितांनी मोर्चा काढला होता. मोर्च्यानंतर त्या वेळी मुंबईचे महापौर असणाऱ्या भुजबळ यांनी ‘हुतात्मा चौकात जाऊन गोमूत्र शिंपडून त्याचे शुद्धीकरण केले होते’, असे म्हटले जाते. असे भुजबळ आता पुजाऱ्यांचा धर्म आणि धंदा यांवरून विधाने करत आहेत. या देशात राजकारण्यांनी जो बिना मुद्दलाचा धंदा चालू केला आहे, त्यातून ते कोट्यवधी रुपये कमवत आहेत, त्याविषयी भुजबळ कधीही त्यांचे तोंड उघडणार नाहीत. आताचे त्यांचे पक्षप्रमुख शरद पवार यांच्यावर भुजबळ यांनी शिवसेनेत असतांना भूखंडांच्या भ्रष्टाचारावरून ‘भूखंडांचे श्रीखंड ओरपणारे’ अशी टीका विधानसभेत केली होती. याच भुजबळांकडे आज कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. ‘ती त्यांनी कोणत्या धंद्याद्वारे मिळवली, हे सर्वसामान्य जनतेला ठाऊक नाही’, असे कसे म्हणणार ? भुजबळच नव्हे, तर ‘राजकारण्यांकडे अशा प्रकारची कोट्यवधी रुपयांची संपत्ती कोणत्या धंद्यातून त्यांना मिळते ?’, हा जनतेला पडलेला प्रश्नच आहे. विशेष म्हणजे जनतेला याचे उत्तरही ठाऊक आहे; मात्र जनता ते सिद्ध करून दाखवू शकत नाही, असा ‘प्रामाणिक धंदा’ हे राजकारणी करत आहेत. एखादी व्यक्ती सरकारी किंवा खासगी आस्थापनात आयुष्यातील ३०-३५ वर्षे नोकरी केल्यानंतर एक-दोन घरे किंवा एखादी गाडी मिळवण्यापलीकडे काहीही कमवू शकत नाही. राजकारणी मात्र अवघ्या काही वर्षांत कोट्यवधी रुपयांची संपत्ती गोळा करतात. वर भुजबळांसारखे लोक प्रामाणिकपणे पौरोहित्य करणारे किंवा पुजारी यांच्याविषयी अशा प्रकारची विधाने करतात, याला काय म्हणावे ? भुजबळ राजकारणात येण्यापूर्वी मुंबईतील भायखळा येथील बाजारात भाजीचा व्यवसाय करत होते, आयुष्यभर जरी ते हा व्यवसाय करत राहिले असते, तरी आज त्यांच्याकडे जितकी संपत्ती आहे, तितकी ते कधी मिळवू शकले असते का ? पुजाऱ्यांना जे काही उत्पन्न मिळते, त्यात ते त्यांचा चरितार्थ चालवत आहेत. त्यांनी भुजबळ किंवा राजकारणी यांचा ‘मार्ग’ चोखाळला नाही, हे कौतुकास्पद आहे. आज देशात मागासवर्गियांना असलेल्या आरक्षणामुळे ब्राह्मणांना म्हणजेच पौराहित्य करणाऱ्यांना, पुजाऱ्यांना सरकारी नोकऱ्या आणि सरकारी सुविधा मिळत नाहीत. त्यांच्यासाठी कोणत्याही योजना राखबल्या जात नाहीत. त्यांना सरकारी मानधन मिळत नाही. याउलट मशिदीच्या इमामांना मात्र काही राज्यांमध्ये काही सहस्र रुपयांचे मानधन दिले जाते. ‘असे मानधन पुजाऱ्यांनाही मिळावे’, असे भुजबळ म्हणत नाहीत, हे लक्षात घ्या.
धर्माचरणी शासनकर्ते आणि समाज हवा !
भुजबळ ‘देवळांत पुजाऱ्यांनाच म्हणजे ब्राह्मणांनाच आरक्षण कसे ?’ असा प्रश्न विचारत आहेत. भुजबळ यांचा हिंदु धर्माचा अभ्यास नसल्याने ते अशी अभ्यासहीन टीका करत आहेत. ‘सध्याचे पुरो(अधो)गामी राजकारणी हिंदु धर्मावर टीका करून त्यांचा ‘धंदा’ चालवत आहेत’, असे कुणी म्हटल्यास ते चुकीचे ठरू नये. त्याच पठडीत भुजबळ यांचे विधान आहे. त्यातही आता महाराष्ट्रात न्यायालयाच्या आदेशानंतर काही मंदिरांमध्ये ‘सरकारी पुजारी’ नियुक्त होत आहेत. त्यांना शिक्षण दिले जात आहे. तरीही भुजबळ ब्राह्मणांना लक्ष्य करून टीका करत आहेत. हिंदु धर्मशास्त्रानुसार प्रत्येक कर्म प्रामाणिकपणे करणे हा त्याचा धर्मच असतो. धर्म म्हणजे एखादा पंथ नाही, तर जे प्रामाणिक आहे, सत्य आहे, ते करणे. सुतारकाम करणारी व्यक्ती जे कर्म करते, ते अधिकाधिक परिपूर्ण आणि प्रामाणिकपणे करणे हा तिचा धर्म आहे. राजकारण्यांनी राजकारण करणे, हा त्यांचा धर्म आहे. अशा कर्माच्या धर्माचे पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ते जर तो करत नसेल, तर त्याला ‘अधर्मी’ म्हटले जाते. जर एखादा पुजारी हे कर्तव्यकर्म धर्मानुसार करत नसेल, तर ते चुकीचेच म्हणायला हवे; मात्र भुजबळ जो आरोप करत आहेत, तो अशा धर्माच्या आधारे नाही, तर जातीच्या आधारे करत आहेत, जो भुजबळांच्या राजकारणाच्या धर्माच्या विपरीत आहे. त्यामुळे कोण किती धर्माचे पालन करून कर्तव्य करतो, हा आता संशोधनाचाच विषय आहे. त्यातही राजकारणी त्यांच्या धर्माचे पालन करत नसल्याने आज समाजही त्याच दिशेने जात आहे. ‘राजा कालस्य कारणम् ।’ असे महाभारतात धर्माने म्हणजे युधिष्ठिराने म्हटलेले आहे. ‘आजचे अनेक राजकारणी अधर्मी आहेत’, असेच जनतेला वाटत आहे. या अधर्मींचा परिणाम समाजावर होत असल्याने समाजात अधर्म बोकाळला आहे. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे, ‘जेव्हा जेव्हा समाजात अधर्म बोकाळतो, तेव्हा तेव्हा मी अवतार घेऊन धर्माची स्थापना करतो.’ यामुळे आताही भगवंत कोणत्या ना कोणत्या माध्यमांतून समाजातील अधर्माचा नाश करून धर्माची पुनर्स्थापना करणार आहे. म्हणजेच ‘धर्माचरणी शासनकर्ते आणि समाज यांची निर्मिती होणार आहे’, असे अनेक द्रष्टे आणि संत सांगत आहेत. त्याचीच धर्माचरणी नागरिक वाट पहात आहेत !
राजकारणाचा ‘धंदा’ करणाऱ्यांना हटवून धर्माचरणी शासनकर्ते आणण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! |