भारत ‘सेक्युलर’ (निधर्मी) राष्ट्र आहे, तर ‘अल्पसंख्यांक’ हा विचारच चुकीचा ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करनाल (हरियाणा) येथे प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन
करनाल (हरियाणा) – भारतात हिंदु बहुसंख्यांक आहेत. त्यामुळे हिंदूंनी चूप राहिले पाहिजे, असे सांगण्यात येते. काश्मीरमध्ये हिंदू अल्पसंख्यांक आहेत; म्हणून त्यांना तेथे दाबले जाते. पाकिस्तानमध्ये हिंदू अल्पसंख्यांक आहेत; म्हणून तेथेही त्यांना दाबले जात आहे, म्हणजे हिंदू बहुसंख्य असो किंवा अल्पसंख्य कोणत्याही परिस्थितीत हिंदूंनी अधिकाराची गोष्ट करू नये आणि त्यांनी गप्प रहावे, असेच सांगण्यात येते. जर भारत ‘हिंदु राष्ट्र’ नसून ‘सेक्युलर’ (निधर्मी) राष्ट्र आहे, तर ‘अल्पसंख्यांक’ हा विचारच चुकीचा आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील सारस्वत ब्राह्मण सभा, सेक्टर ८ मध्ये नुकतेच प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन घेण्यात आले. या अधिवेशनाला संबोधित करतांना ते मार्गदर्शन करत होते.
या अधिवेशनाचा प्रारंभ सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, विश्व हिंदु परिषदेचे प्रांत संघटनमंत्री श्री. ऋषिपाल शास्त्री आणि सारस्वत ब्राह्मण सभेचे प्रमुख श्री. सुभाष शर्मा यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. त्यानंतर हिंदु राष्ट्राचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. अधिवेशनाचा उद्देश समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांनी सांगितला,तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे श्री. कार्तिक साळुंके यांनी केले. या अधिवेशनाला करनाल आणि पानिपत येथून अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गोरक्षक, पुरोहित, सामाजिक कार्यकर्ते आणि मंदिरांचे विश्वस्त उपस्थित होते.
हिंदुत्वनिष्ठांनी केलेले उद्बोधन
सर्व अधिग्रहित मंदिरे संत आणि समाजातील प्रतिष्ठित बुद्धीवंत यांच्याकडे सोपवावीत ! – ऋषिपाल शास्त्री, प्रांत संघटनमंत्री, विश्व हिंदु परिषद
मोगलांनी आमच्या मंदिरांचा विध्वंस केला, इंग्रजांच्या काळात मंदिरांचे अधिग्रहण करणे चालू झाले आणि आजही ती पद्धत चालू आहे. भारतातील एकही राज्य नाही की, जेथे सरकारांनी मंदिरांचे अधिग्रहण केलेले नाही. कोणत्याही परिस्थितीत मंदिरांचे अधिग्रहण होऊ नये, तसेच सर्व मंदिरे संत अन् समाजातील प्रतिष्ठित बुद्धीवंत यांच्याकडे सोपवली पाहिजेत, अशी आमची भूमिका आहे.
सर्व हिंदु समाजाला देशभक्तीच्या चेतनेशी जोडले पाहिजे ! – सुभाष शर्मा, प्रमुख, सारस्वत ब्राह्मण सभा
आज हिंदु समाजाला जातींच्या आधारांवर विभक्त करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सर्व हिंदु समाजाला देशभक्तीच्या चेतनेशी जोडले पाहिजे. हिंदु राष्ट्राविषयी अन्य पंथियांमध्ये असलेल्या शंकांचे समाधान करून त्यांच्यातही हिंदु राष्ट्राविषयी मान्यता निर्माण व्हावी, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.