म्हापसा येथील गणेशपुरी विश्वस्त मंडळावरून सलीम इसानी यांनी दिले त्यागपत्र
हिंदूंनी केलेल्या विरोधाचे फलित !
म्हापसा, २३ एप्रिल (वार्ता.) – मुसलमान असल्याच्या सूत्रावरून उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर येथील उद्योजक सलीम इसानी यांनी गणेशपुरी, म्हापसा येथील श्री गणेशपुरी विश्वस्त मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यत्वाचे त्यागपत्र दिले आहे.
सुमारे २१ दिवसांपूर्वी श्री गणेशपुरी विश्वस्त मंडळाच्या ११ सदस्यीय कार्यकारिणीची वर्ष २०२२ ते २०२५ या कालावधीसाठी बिनविरोध निवड झाली होती आणि यामध्ये प्रथमच एक महिला आणि सलीम इसानी या मुसलमान धर्मीय व्यक्ती यांसामावून घेण्यात आले होते. विश्वस्त मंडळाच्या नियमावलीनुसार गणेशपुरी वसाहतीत वास्तव्यास असलेल्या कोणत्याही धर्मातील पुरुष अथवा स्त्री विश्वस्त होऊ शकते आणि त्यानुसार सलीम इसानी हे वर्ष १९९३ पासून मंडळाचे विश्वस्त आहेत; मात्र ‘सलीम इसानी मुसलमान असल्याने त्यांनी कार्यकारिणीवरील एखादे पद भूषवणे अयोग्य आहे’, असे मत स्थानिक रहिवासी खासगीत बोलतांना व्यक्त करत होते. ‘मुसलमान संस्थांच्या कार्यकारिणीवर हिंदूंना घेतले जात नाही, त्यामुळे केवळ श्री गणेशपुरी विश्वस्त मंडळानेच वेगळा पायंडा घालणे अयोग्य ठरते’, असे मत अनेकांकडून व्यक्त होत होते. या पार्श्वभूमीवर सलीम इसानी यांनी श्री गणेशपुरी विश्वस्त मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यत्वाचे त्यागपत्र दिले आहे.