धोरणकर्त्याच्या अंतःकरणाला पाझर फुटणारे साहित्य निर्माण व्हायला हवे ! – डॉ. अशोक ढवण, कुलगुरु, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ
९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसंवाद
उदगीर (जिल्हा लातूर) – वैद्याचा मुलगा वैद्य होतो, अभियंत्याचा मुलगा अभियंता होतो; मात्र शेतकऱ्याचा मुलगा शेती करण्यास सिद्ध होत नाही, कारण शेती आजही आतबट्ट्याचा व्यवसाय आहे. शेतकरी आजही विपन्नावस्थेत जीवन जगत आहे. शेतकऱ्याच्या जीवनाची नासाडी होत आहे. म्हणून एक दबावगट निर्माण होईल, असे साहित्य निर्माण होण्याची आवश्यकता आहे. धोरणकर्त्याच्या अंतःकरणाला पाझर फुटत नाही तोपर्यंत हे साहित्य वांझोटे ठरेल, अशी खंत परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी व्यक्त केली. ते उदगीर (लातूर) येथे आयोजित ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवसाच्या द्वितीय सत्रातील ‘मराठी साहित्यातील शेतकऱ्याचे चित्रण : किती खरे किती खोटे ?’ या परिसंवादाच्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते. या परिसंवादात डॉ. दिलीप बिरुटे, आण्णा वैद्य, डॉ. जयद्रथ जाधव, वि.दा. पिंगळे, डॉ. म.ई. तंगावार सहभागी झाले होते.
कथा, कविता, कादंबरी, नाटक, चित्रपट यांतून अनेक लेखक अन् दिगदर्शक यांनी शेतकरी जीवनाचे यथार्थ चित्रण करण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्याला साहित्यातून जगण्याची प्रेरणा आणि बळ मिळते. अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत आवश्यकतांपैकी अन्न आणि वस्त्र या दोन मूलभूत आवश्यकता भागवणारा शेतकरी आहे. वर्ष १९६० पूर्वीचे बरेचसे साहित्य एकांगी, स्वप्नरंजन, चार भिंतीच्या आत बसून केलेले चित्रण होते. त्यात वास्तवता नव्हती. वर्ष १९६० नंतर मात्र शेतकऱ्यांची मुले शिकून पुढे आली आणि त्यांनी शेतकऱ्याच्या जीवनाची दाहकता दर्शवणारे, वास्तववादी साहित्य पुढे आणले. शिक्षणाने शेतकऱ्यांना आत्मभान प्राप्त करून दिले. बहुतेक राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांचा वापर केला. शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला उत्तरदायी कोण ? शेती व्यवसायाला किती सन्मान दिला गेला ? शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ का आली ? याचे लेखन करण्याचे धाडस आज कोणी दाखवत नाही. शेतकरी आत्महत्या होणार नाहीत यासाठी लेखणी, प्रसंगी नांगर उचलावा लागेल. आजही शेतकऱ्याची जनावरे, अनियमित होणारा वीजपुरवठा, नैसर्गिक संकट, विकासाच्या नावाखाली होणारे भूमींचे अधिग्रहण या विषयांवर लेखन होणे अपेक्षित आहे, असा सूर या परिसंवादातून उमटला.