लता मंगेशकर या भारताच्या सांस्कृतिक राजदूत होत्या ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारा’ने सन्मान !
मुंबई – लतादीदी यांनी ३० हून अधिक भाषांत सहस्रावधी गीते गायली. भगवद्गीता, रामचरितमानसगान, बापूजींची भजने हे सर्व लतादीदी यांच्या आवाजाने अमर झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांवरील ‘हिंदूनृसिंहा’, समर्थ गुरु रामदासस्वामी यांचे श्लोक, शिवकल्याणराजा या स्वरांना लतादीदी यांनी अमर केले. त्यांचे ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे गीत भारतातील नागरिकांच्या जीभेवर आहे. लता मंगेशकर या श्रेष्ठ भारताची मधूर प्रस्तृती आहेत. त्या भारताच्या सांस्कृतिक राजदूत होत्या, असे गौरवोद्गार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान’च्या वतीने ‘लता दीनानाथ मंगेशकर’ या नावाने दिला जाणारा प्रथम पुरस्कार नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. २४ एप्रिल या दिवशी षण्मुखानंद सभागृहात मंगेशकर कुटुंबियांकडून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आदीनाथ मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना खडीकर-मंगेशकर यांच्या हस्ते हा पुस्कार नरेंद्र मोदी यांना देण्यात आला. या वेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या वेळी मनोगत व्यक्त करतांना सरस्वतीमातेला वंदन करून पंतप्रधान मोदी यांनी भाषणाला प्रारंभ केला.
या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,
१. संगीत ही एक साधना आणि भावनाही आहे. आपल्या अव्यक्त भावनेला शब्द व्यक्त करतात. नाद या शब्दांना चेतना देतात, तर चेतनेमध्ये भाव भरण्याचे काम संगीत करते.
२. संगीताचे स्वर डोळ्यांत अश्रू आणू शकतात, वैराग्याचा बोध देऊ शकतात, वीररस निर्माण करू शकतात, मातृत्व आणि ममता जागृत करू शकतात. राष्ट्रभक्ती जागृत करू शकतात आणि कर्तव्याच्या शिखरावर पोचवू शकतात. संगीताचे हे सामर्थ्य आपण लतादीदी यांच्या रूपात पाहिले.
३. लतादीदी सूरसम्राज्ञीसमवेत माझी मोठी बहीण होत्या. त्याच्याकडून मला मोठ्या बहिणीप्रमाणे अपार प्रेम मिळाले. मी सन्मान स्वीकारण्यापासून दूर रहातो; मात्र पुरस्कार ‘लतादीदी’ यांच्या नावाने असल्यामुळे ते त्यांच्या प्रेमाचे प्रतीक आहे. हा पुरस्कार मी सर्व देशवासियांसाठी समर्पित करतो.
४. लतादीदी सांगत ‘मनुष्य वयाने नव्हे, तर देशासाठी कार्य करून मोठा होतो.’ लतादीदी वय आणि कर्म या दोघांनी मोठ्या होत्या. त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करून देश गौरवान्वित झाला.
५. लतादीदी यांच्यासाठी संगीत म्हणजेच ईश्वराची साधना होती. ईश्वराचे उच्चारण हे स्वराविना अपूर्ण आहे. जेथे स्वर आहेत, तेथे पूर्णत्व आहे. आपले हृदय आणि अंतर्मन यांवर संगिताचा परिणाम होतो. लतादीदी यांचे स्वर युवापिढीसाठी प्रेरणा आहेत.
६. पंडित दीनानाथ मंगेशकर यांनी ब्रिटिशांपुढे स्वातंत्र्यवीर सावरकरलिखित इंग्रजांच्या साम्राज्याला आव्हान देणारे गीत गायिले होते. लतादीदी यांच्यामध्ये असलेली राष्ट्रभक्ती त्यांना त्यांच्या वडिलांकडून प्राप्त झाली होती.