‘मलबार गोल्ड’चा हिंदुद्वेष !
हिंदु धर्माचा अवमान करणाऱ्या विज्ञापनांना वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक !
‘मलबार गोल्ड अँड डायमंड्स’ या दागिन्यांचे उत्पादन करणाऱ्या आस्थापनाने हिंदूंच्या अक्षय्य तृतीया या सणाच्या पार्श्वभूमीवर विज्ञापन प्रसिद्ध केले होते. त्यामध्ये अभिनेत्री करीना कपूर खान यांना ‘मॉडेल’ म्हणून दागिन्यांमध्ये दाखवतांना टिकली अथवा कुंकू न लावलेले दाखवले होते. हिंदु सणांच्या वेळी स्वत:चे दागिने विक्री व्हावेत; म्हणून बनवलेल्या विज्ञापनात हिंदु स्त्रीचे भूषण असलेले कुंकू अथवा टिकली न दाखवणे, हा निवळ हिंदु धर्मद्वेषच आहे. टिकली आणि कुंकू हिंदु स्त्रीच्या सौभाग्यालंकाराचाच घटक आहे. ‘मलबार गोल्ड’ या आस्थापनाच्या मालकाचे नाव एम्.पी. अहमद असून त्यांच्या धर्मातील स्त्रिया कुंकू अथवा टिकली लावत नाहीत, त्याला कुणाची हरकत नाही; मात्र अक्षय्य तृतीयेच्या सणाला हिंदू सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करतात. या कृतीचा व्यावसायिक लाभ मिळवण्यासाठी वापर करतांना आस्थापनाने हिंदु धर्माचाच अवमान केला आहे. त्यांना हिंदूंचे पैसे हवेत; पण त्यांची परंपरा मात्र नको, असे झाले.
हिंदुविरोधी आस्थापने !
यापूर्वी तनिष्क, फॅब इंडिया, मित्रा, जावेद हबीब आदींनी हिंदुविरोधी विज्ञापनेच प्रसिद्ध केली होती. दागिन्यांच्या विज्ञापनांमध्ये दाखवलेल्या मॉडेल स्त्रिया या कुंकू अथवा टिकली न लावलेल्याच दाखवल्या जातात, तसेच त्यांचे चेहरे उत्साही न दाखवता अतिशय नीरस अन् उदासीन दाखवले जातात. यापूर्वी ‘फॅब इंडिया’ या आस्थापनाने दोन मॉडेल्सने दागिने घातलेले विज्ञापन बनवले होते. या विज्ञापनातील मॉडेलनेही कपाळ मोकळे सोडले होते. याविषयी एक हिंदुत्वनिष्ठ लेखिका शेफाली वैद्य यांनी ट्विटरवर मोहीम चालवली होती. त्या मोहिमेत हिंदूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. परिणामी आस्थापनाला विज्ञापन मागे घेणे भाग पडले होते.
तनिष्कने तर दागिन्यांचे विज्ञापन बनवतांना त्यामध्ये ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन दिले. दागिने घातलेली हिंदु महिला मुसलमानाशी निकाह करतांनाचा प्रसंग त्यामध्ये दाखवला होता आणि ‘मुसलमानाकडे अधिक सुरक्षित आहे’, असा त्याचा काहीसा आशय होता. त्याविरुद्ध हिंदूंनी सामाजिक माध्यमांतून आवाज उठवल्यावर तनिष्कने क्षमायाचना केली होती.
मलबारने विज्ञापन पालटले !
मलबार आस्थापनाच्या विज्ञापनाविरुद्ध हिंदु जनजागृती समितीने ‘#No_Bindi_No_Business’ हा ‘हॅशटॅग’ चालवत ट्विटरवर अभियान घेतल्यावर हिंदूंनी त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याने आस्थापनाने दुसऱ्याच दिवशी विज्ञापन पालटले आहे. करीना कपूर खान यांच्या जागी टिकली लावलेली तमन्ना भाटिया या अभिनेत्रीचे नवीन विज्ञापन प्रसारित केले आहे. हा हिंदूंच्या विरोधाचा आणि सामाजिक माध्यमाच्या शक्तीचा परिणाम आहे. या विज्ञापनाला हिंदूंनी विरोध केला नसता, जागृती केली नसती, तर आस्थापनाला कोण खडसावणार होते ?
हिंदूंना धर्मापासून दूर नेण्याचा प्रयत्न
वेगळ्या संदर्भात विचार करायचा झाला, तर विज्ञापन हे अन्य माध्यमांप्रमाणे समाजजागृती आणि प्रबोधन यांचे उत्तम माध्यम आहे. हिंदु धर्म संपवण्यासाठी विविध हिंदुद्वेषी घटकांकडून अनेक प्रयत्न चालू आहेत. काही प्रयत्न उघड, तर काही छुपे आहेत. विज्ञापनांतून आर्थिक लाभ कमावतांना हिंदूंच्या संबंधित धार्मिक गोष्टींवर प्रहारच केला जातो. सर्वसाधारण हिंदु स्त्रिया केस मोकळे सोडत नाहीत; मात्र विज्ञापनांमध्ये केस मोकळे सोडलेल्या स्त्रिया सर्रास दाखवल्या जात असल्याने हिंदु स्त्री त्याप्रमाणेच वागू लागली आहे. टिकली न लावलेल्या स्त्रीचे विज्ञापन पहातांना अन्य हिंदु स्त्रियांच्या मनावर हा कुसंस्कारच होत आहे. कालांतराने नियमित कुंकू अथवा टिकली लावणाऱ्या महिलाही ते न लावण्याची आणि तशी पद्धत बंदच होण्याची शक्यता अधिक आहे. सध्या विज्ञापने अथवा मालिका यांमध्ये टिकली लावलेल्या महिलेची टिकली एवढी लहान आकारात लावली जाते की, जणू तिने टिकली लावलीच नाही, असे वाटावे. आता हिंदु महिलांमध्ये याचाही प्रारंभ झाला आहे. हळूहळू हिंदूंना धर्माचरणापासून दूर नेण्याचा हा पद्धतशीर केलेला प्रयत्न आहे. हाच भाग कपडे, खाण्याच्या पद्धती, सवयी यांच्या संदर्भातही झाला आहे.
आर्थिक बहिष्कार हाच सर्वाेत्तम उपाय
याउलट आखाती देशांमध्ये वृत्तनिवेदन करणारी महिला ही हिजाब घालून बातम्या सांगते. कर्नाटकात तर हिजाब घालून शाळेत आणि महाविद्यालयात जाता येण्यासाठी केवढा मोठा वाद निर्माण झाला ! तो वाद थेट आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोचला. अन्य धर्मीय त्यांच्या धार्मिक कृतींविषयी पुष्कळ जागरूक असतात. हिंदूंचे मात्र तसे नाही. परिणामी हिंदु धर्माचा अवमान करणाऱ्यांचे फावते. हिंदुविरोधी विज्ञापनांविषयी हिंदूंमध्ये जागृती निर्माण होत असल्याने आणि सामाजिक माध्यमांद्वारे विषय सर्वदूर पोचत असल्याने अवमान करणाऱ्यांना तात्काळ अटकावही करता येतो, हे वरील उदाहरणांवरून लक्षात येते. बहुसंख्य हिंदूंच्या देशात राहून ही आस्थापने, संघटना, संस्था हिंदुविरोधी कारस्थाने रचत असतांना त्यांना वैध मार्गाने विरोध करण्याची कृती सर्वाेत्तम आहे. यामुळे मोठे वाटणारे विरोधकही गळून पडतात. हिजाब वादानंतर कर्नाटकात मंदिराच्या परिसरात केवळ हिंदु व्यापारीच व्यापार करू शकतात. अहिंदूंना प्रवेश निषिद्ध केल्यावर तेथील मुसलमानांच्या व्यापारी गटाच्या प्रमुखांनी आक्षेप घेतला आणि राज्यपालांपर्यंत विषय नेला; मात्र हिंदू निर्णयावर ठाम राहिले आहेत. सध्या सामाजिक माध्यमांवर हलाल प्रमाणित उत्पादनांवर बहिष्कार घालण्याच्या चळवळीने जोर पकडला आहे. याविषयी मुसलमान चिंतित झाले आहेत. हिंदूंचा सन्मान विज्ञापनकर्ता, अभिनेते, अभिनेत्री, चित्रपट अथवा मालिका निर्माते यांनी राखणे आवश्यकच आहे, अन्यथा वैध मार्गाने विरोध ठरलेलाच आहे, हे निश्चित !