क्रांतीकारकांच्या बलीदानाच्या पुण्यस्मरणाने अखंड भारताच्या निर्मितीसाठी तरुणांची मानसिकता घडेल ! – डॉ. अजय कुलकर्णी, महासचिव, स्वातंत्र्यवीर सावरकर समिती

उदगीर (जिल्हा लातूर) येथे चालू असलेल्या ९५ वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे वार्तांकन

पुणे – क्रांतीकारकांच्या बलीदानाचे पुण्यस्मरण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने झाले पाहिजे. तसे झाले, तरच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अखंड भारताचे जे स्वप्न होते, त्याच्या निर्मितीसाठी आजच्या तरुणांची मानसिकता घडेल. हे राष्ट्र बलशाली करण्यासाठी साहित्यिकांनी पुढे आले पाहिजे. ज्या स्वातंत्र्यविरांनी प्राणांचे बलीदान दिले आहे, त्यांचे साहित्याच्या माध्यमातून स्मरण झाले पाहिजे. त्यासाठी कादंबरी हे उत्तम माध्यम आहे. त्यांचे संपूर्ण जीवन चरित्र, त्यांचा कार्यकाळ, त्यांनी केलेला त्याग सर्वांच्या समोर येईल. त्यातूनच ही नवी पिढी पुन्हा एकदा राष्ट्रभक्त म्हणून निर्माण होईल, असे परखड प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर समितीचे महासचिव डॉ. अजय कुलकर्णी यांनी केले. उदगीर येथे चालू असलेल्या ९५ व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात २२ एप्रिल या दिवशी ‘देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे पूर्ण झाली. या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपण काय कमावले ? काय गमावले ?’, या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे माजी कुलगुरु डॉ. जनार्दन वाघमारे यांनी परिसंवादाचे अध्यक्षस्थान भूषवले. तसेच विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. (सौ.) नीलम गोऱ्हे आणि राजेश करपे आदींनी सहभाग घेतला.

लोकशाही मार्गाने झालेले सत्ता परिवर्तन, ही फार मोठी गोष्ट आपण कमावली आहे ! – डॉ. (सौ.) नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद

लोकशाही पद्धतीने क्रांती होऊ शकते, सत्तापालट होऊ शकतो. पाकिस्तानमध्ये लष्कराचे बंड होऊन पंतप्रधान पालटले जातात; पण भारतामध्ये असे घडत नाही, तर शांततामय मार्गाने मतपेटीच्या माध्यमातून परिवर्तन होऊ शकते, हे समाजाने दाखवून दिले आहे. हे यश जनतेचे, म्हणजेच सामान्य मतदारांचे आहे. लोकशाहीमधून झालेले सत्ता परिवर्तन ही फार मोठी गोष्ट आपण कमावली आहे. समाजातील विषमता दूर करण्यासाठी राज्यघटनेचे तत्त्व स्वीकारणे, ही मोठी गोष्ट आहे.

आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, हीच सगळ्यात मोठी उपलब्धता आहे ! – डॉ. जनार्दन वाघमारे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे माजी कुलगुरु

आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, हीच सगळ्यात मोठी उपलब्धता आहे. सरदार वल्लभाई पटेल यांच्या दूरदृष्टीपणामुळे ५६२ संस्थाने भारतात विलीन झाली. त्यानंतर डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटना बनवली. त्यानंतरच्या काळात अनेक क्षेत्रांत सुधारणा होत माहितीच्या अधिकाराखाली एखादी गोष्ट माहिती होऊ शकते, एवढा विकास केला गेला. देश अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झाला. आज देशाची राज्यघटना धोक्यात असून तिच्यावर आघात होत आहेत. धर्म आणि मंदिरे राजकारणासाठी वापरली जात आहेत. (जेव्हा मूळ राज्यघटनेत ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द घुसडला गेला, तेव्हा राज्यघटना धोक्यात आली नव्हती का ? तसेच देशातील हिंदूंची मंदिरे आजही अवैध ठरवून पाडली जातात, त्या वेळी राजकारण होत नाही का ? – संपादक) सध्याच्या राजकारणाने विश्वासार्हता गमावली आहे.


(म्हणे) ‘प्रेक्षक ग्राहक बनला असल्याने आम्हाला टी.आर्.पी. अधिक असलेल्या बातम्या दाखवाव्या लागतात !’ – नम्रता वागळे, वृत्तनिवेदिका

‘प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता आज शून्यावर येऊन ठेपली आहे !’, या विषयावरील परिसंवाद

उदगीर (जिल्हा लातूर), २४ एप्रिल (वार्ता.) – बोक्यांची (लोकप्रतिनिधींची) भांडणे लोकांना बघायला आवडतात. त्याला टी.आर्.पी. अधिक मिळतो, तसेच प्रसिद्धीमाध्यमांना आर्थिक गणित जोडलेले असल्यामुळे आम्हाला टी.आर्.पी. अधिक असलेल्या बातम्या दाखवाव्या लागतात. वाचक आणि प्रेक्षक हे ग्राहक बनलेले आहेत. त्यामुळे आम्हाला प्रेक्षकाला जे आवडते ते द्यावे लागते, असे मत ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीच्या वृत्तनिवेदिका नम्रता वागळे यांनी केले. त्या संमेलनातील ‘प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता आज शून्यावर येऊन ठेपली आहे !’ या परिसंवादात बोलत होत्या. या परिसंवादात सहभागी झालेल्या वक्त्यांचा सूर ‘प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता शून्यावर आलेली नसून ती न्यून झाली आहे’, असा होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ पत्रकार जयदेव डोळे हे होते.

प्रसिद्धीमाध्यमांची विश्वासार्हता न्यून होत चालली आहे ! – प्रदीप नणंदकर, स्तंभलेखक

पूर्वी ‘वसा’ घेऊन काम करणारे वृत्तपत्र होते; मात्र सध्या तसे वृत्तपत्र राहिले नाही. पैशांसाठी काम करणारे वृत्तपत्र आणि किराणा मालाचे दुकान यांत काहीच भेद राहिलेला नाही. वृत्तपत्रामध्ये असलेल्या बातम्या या ‘बातम्या आहेत कि विज्ञापन आहे ?’, हे समजणे कठीण आहे. समाज घडवणे, हे वृत्तपत्रांचे काम आहे. आता वृत्तपत्रांमध्ये संपादकांना किंमत नाही; मात्र विज्ञापनप्रमुखांना मोठे स्थान असते. त्यामुळे प्रसिद्धीमाध्यमांची विश्वासार्हता न्यून होत चालली आहे.

(म्हणे) ‘योगी आदित्यनाथ यांनी ५ पत्रकारांना जाणीवपूर्वक कारागृहात बसवले !’ – जयदेव डोळे, वरिष्ठ पत्रकार

पंतप्रधानांनी एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. त्यांना पत्रकारांशी संवादच साधायचा नाही, त्यामुळे ‘संमेलनाचे शीर्षक योग्य आहे’, असे म्हणावे लागेल. पुष्कळ वृत्तपत्रे ही राजकीय पुढाऱ्यांची असतात. केजरीवाल सरकार विज्ञापन देऊन स्वत:चे कौतुक ‘हिंदी’ वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यास सांगतात, हे किती जणांना ठाऊक आहे. जे विकते, ते खपवण्याचा प्रयत्न करू नका. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ५ पत्रकारांना जाणीवपूर्वक कारागृहात बसवले आहे. मोदींवर टीका केली; म्हणून मला देशद्रोही ठरवणे अयोग्य आहे. देशाचा विकास व्हावा, हाच टीका करण्याचा माझा उद्देश असतो.

संपादकीय भूमिका

चौथा आधारस्तंभ असणारी पत्रकारिता लोकशाहीचा आधार राहिली नाही, हे दर्शवणारे वक्तव्य ! अशी पत्रकारिता काय कामाची ?


(म्हणे) ‘विवाह, कुटुंबव्यवस्था आणि नातेसंबंध या व्यवस्थांनी स्त्रियांना बंधने लादली !’ – रमेश शिंदे, लेखक

‘मराठी लेखिकांचे लेखन स्त्रीवादात अडकले आहे का ?’, या विषयावरील परिसंवादात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चा उदोउदो

उदगीर (जिल्हा लातूर), २४ एप्रिल (वार्ता.) – सध्या स्त्रीच्या पारंपरिक आदर्शवादाची प्रतिमा पालटून तिच्या खऱ्या भूमिकेकडे जाण्याची चिकित्सा लेखिकांच्या लेखनातून दिसून येते. विवाह, कुटुंबव्यवस्था आणि नातेसंबंध या व्यवस्थांनी स्त्रियांना बंधने लादली. या बंधनात अडकण्यापेक्षा ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहून या चौकटी तोडणेच योग्य आहे, असे स्त्रियांना वाटू लागले आहे, असे प्रतिपादन करत लेखक रमेश शिंदे यांनी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चा उदोउदो केला. ते मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी (२२ एप्रिल) ‘मराठी लेखिकांचे लेखन स्त्रीवादात अडकले आहे का ?’, या विषयावरील परिसंवादामध्ये बोलत होते. (हिंदु धर्म आणि भारतीय संस्कृती यांनी स्त्रियांना कधीही अन्य पंथियांप्रमाणे उपभोग्य वस्तू मानलेले नाही. याउलट हिंदु धर्माने स्त्रीला आदिमाया शक्तीचे रूप मानले आहे. भारतीय संस्कृतीत महिलेचा सर्वांगीण विकास होतो. असे असतांना स्त्रियांवरील अन्यायाचा आव आणून उर बडवणारे पाश्चात्त्य संस्कृतीचा उदोउदो करतात, हे न कळण्याइतकी जनता दूधखुळी नाही. – संपादक) या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दिलीप धोंडगे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

या वेळी स्त्रीवादी लेखिका नीरजा या ‘स्त्रीवादी चळवळी’ची व्याख्या सांगतांना म्हणाल्या की, स्त्रीवाद ही सामाजिक आणि राजकीय चळवळ आहे. ‘सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, सामाजिक अशा सर्व पातळीवर स्त्रियांना समान हक्क मिळायला हवेत’, असे ही चळवळ मानते. ‘स्त्री’च्या पोटी जन्म होत असूनही पृथ्वीच्या निर्मितीचे श्रेयही पुरुषाला, म्हणजे ब्रह्मदेवाला दिलेले आहे, हे अयोग्य आहे. (यावरून लेखिका नीरजा यांचे देवतांविषयीचे अज्ञानच दिसून येते ! – संपादक) जे अधिकार पुरुषांना आहेत, ते सर्व स्त्रियांना मिळायला हवेत. तसेच ज्याप्रमाणे स्त्रियांना चौकटीत बसवणारी व्यवस्था आहे, त्याप्रमाणे पुरुषांनाही चौकटीत बसवणारी व्यवस्था असायला हवी. (हिंदु धर्म आणि भारतीय संस्कृती यांनी कधीही स्त्रीला कर्तेपणापासून रोखले नाही. शूरवीर विद्वान महिलांची परंपरा भारताला लाभली आहे. स्त्री-पुरुष समानतेचा अर्थ समजून न घेता काहीही बरळणाऱ्या लेखिकांनी धर्मशिक्षण घेणे आवश्यक आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

साहित्य संमेलनात हिंदु धर्मावर टीका करणारे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी किती प्रयत्न करतात ?