परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या परीस स्पर्शाने त्यांच्यासम भासणारे एस्.एस्.आर्.एफ.चे सद्गुरु सिरियाक वाले !
चैत्र कृष्ण दशमी (२५.४.२०२२) या दिवशी एस्.एस्.आर्.एफ.चे सद्गुरु सिरियाक वाले यांचा ५१ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने…
चैत्र कृष्ण दशमी (२५.४.२०२२) या दिवशी सद्गुरु सिरियाक वाले यांचा ५१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त रामनाथी आश्रमातील साधक श्री. सुनील सोनीकर यांना जाणवलेली त्यांची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.
८.४.२०२२ या दिवशी दुपारी मी रामनाथी आश्रमात महाप्रसाद घेत असतांना सद्गुरु सिरियाक वाले तेथे आले. त्यांचा आणि माझा प्रत्यक्ष परिचय कधीच झाला नाही; परंतु त्यांना पाहिल्यावर मला त्यांच्या तोंडवळ्यावरचे तेज, प्रीती आणि आनंद पाहून ते अगदी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखेच वाटत होते. त्यांनी नमस्काराची मुद्रा केली होती आणि ते आश्रमातील मराठी साधकांच्या समवेत पुष्कळ आपुलकीने बोलत होते. त्यांचे शांत व्यक्तीमत्त्व पाहून मला ते अगदी गुरुदेवांसारखेच वाटत होते. ‘जसे गुरुदेवांकडे पहात रहावे’, असे वाटते, अगदी तसेच ‘त्यांच्याकडे पहात रहावे’, असे मला वाटत होते. त्यांच्यातील प्रीतीच्या स्पंदनांमुळे मला पुष्कळ आनंद जाणवत होता. त्यांच्याशी संभाषण न करताही मला केवळ त्यांना पाहून आणि त्यांच्या अस्तित्वानेच आनंद होत होता. सद्गुरु सिरियाक वाले यांना पाहून मला समर्थ रामदासस्वामींनी दासबोधातील (दशक १, समास ४, ओवी १६ मध्ये) म्हटलेल्या पुढील ओवीची आठवण झाली.
शिष्यास गुरुत्व प्राप्त होये ।
सुवर्णे सुवर्ण करिता न ये ।
अर्थ : परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते; पण ते सोने आपल्या स्पर्शाने लोखंडाला सोने बनवू शकत नाही; मात्र गुरु हे शिष्याला ‘गुरुपद’ प्राप्त करून देतात.
‘समर्थांच्या या ओवीनुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या शिष्याला (सद्गुरु सिरियाक वाले यांना) साधनेत त्यांच्यासम बनवल्याचे मला जाणवले.’
– श्री. सुनील सोनीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.४.२०२२)
सद्गुरु सिरियाक वाले अध्यात्मप्रसारासाठी विदेशात असतांना त्यांना आलेल्या त्रासदायक अनुभूती आणि ते गोवा येथील ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या अध्यात्म संशोधन केंद्रात आल्यावर त्यांना आलेल्या चांगल्या अनुभूती
१. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या अध्यात्म संशोधन केंद्रात येण्यापूर्वी आलेल्या त्रासदायक अनुभूती
अ. मला माझ्याभोवती त्रासदायक (काळ्या) शक्तीचे आवरण जाणवत होते.
आ. मला माझे आज्ञाचक्र आणि सहस्रार यांच्या ठिकाणी अन् डोक्याच्या मागे वेदना होत होत्या.
२. गोवा येथील ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या अध्यात्म संशोधन केंद्रात आल्यावर आलेल्या चांगल्या अनुभूती
४.४.२०२२ या दिवशी मी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या अध्यात्म संशोधन केंद्रात आलो.
अ. त्याच दिवशी ‘माझ्या मुखाभोवती असलेले त्रासदायक आवरण न्यून होत आहे’, असे मला जाणवले.
आ. आज्ञाचक्राच्या ठिकाणी आणि डोक्याच्या मागे होणाऱ्या वेदना २४ घंट्यांनी काही प्रमाणात न्यून झाल्याचे मला जाणवले. त्यानंतर मला हलकेपणा जाणवू लागला.
इ. त्यानंतर २ – ३ दिवसांनी मला होत असलेल्या वेदना पूर्णतः उणावल्या आणि मला पुष्कळ हलकेपणा जाणवू लागला.
३. आरती झाल्यावर स्वतःभोवती मानस प्रदक्षिणा घालतांना सूक्ष्मदेह पुष्कळ जड जाणवणे
८.४.२०२२ या दिवशी सकाळी मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात गेलो होतो. तेव्हा तेथे आरती चालू होती. मी आरतीच्या वेळी उभे न रहाता आसंदीवर बसलो. आरती संपल्यावर मी ३ वेळा स्वतःभोवती मानस प्रदक्षिणा घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा माझा सूक्ष्मदेह पुष्कळ जड असून मानस प्रदक्षिणा घालतांना मला तो अधिक जड वाटत होता. (पूर्वी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात होतो, तेव्हा मी आरतीनंतर सहजतेने स्वतःभोवती मानस प्रदक्षिणा घालू शकत असे.) मी विदेशात असतांना काही मास स्वतःभोवती मानस प्रदक्षिणा घालणे मला पुष्कळ कठीण जात होते.
४. ११.४.२०२२ या दिवशी प्रदक्षिणा घालतांना माझा सूक्ष्मदेह हलका झाल्याचे मला जाणवू लागले.
– (सद्गुरु) सिरियाक वाले, युरोप (११.४.२०२२)
|