न्यायपालिकेवरील लोकांचा विश्वास कायम राखण्याचे आव्हान ! – सरन्यायाधीश
नवी देहली – देशाच्या न्याययंत्रणेवर परिणाम करणारी अनेक सूत्रे मी उपस्थित करत आलो आहे. सध्या न्यायपालिकेसह सर्वच संस्थांपुढील मुख्य आव्हान हे ‘लोकांच्या मनात त्यांच्याविषयी असललेला विश्वास कायम राखणे’ हे आहे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांनी केले. ते तमिळनाडूतील न्यायपालिकेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन आणि मद्रास उच्च न्यायालयासाठी ९ मजली प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन यांनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
सरन्यायाधीश पुढे म्हणाले की,
१. ‘तात्काळ न्याय’ मिळण्यासाठी आपण झगडलो, तर खरा न्याय मिळण्यावर विपरीत परिणाम होईल.
२. न्यायदानात अधिक सर्वसमावेशकता आणणे आणि न्यायप्रक्रियेतील भाषेचे अडथळे दूर करणे, यांनाही आपण महत्त्व देतो.
३. ‘कायद्याचे राज्य कायम ठेवणे, तसेच कार्यपालिका आणि विधिमंडळ यांच्याकडून होणार्या अतिरेकावर नियंत्रण ठेवणे, असे मोठे घटनात्मक दायित्व न्यायपालिकेवर सोपवण्यात आले आहे.
४. घटनात्मक मूल्ये कायम राखणे आणि त्यांची कार्यवाही करणे हे आमचे कर्तव्य आहे. हे एक मोठे ओझे आहे, यात काहीच शंका नाही; मात्र आम्ही घटनात्मक शपथ घेतली, त्याच दिवशी आम्ही ते आनंदाने स्वीकारले आहे. यामुळेच न्यायिक संस्था बळकट करण्यास माझे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे.
५. न्यायदान करणे हे केवळ घटनात्मक कर्तव्य नसून सामाजिक कर्तव्यही आहे.
६. न्यायाची प्रक्रिया आणि आपल्या प्रकरणाविषयीची घडामोड, हे पक्षकारांना कळलेच पाहिजेत. एखाद्या विवाहात मंत्र म्हणण्यासारखे ते असू नये.