यापुढे पाकमधील शिक्षणाला भारतात किंमत असणार नाही !

पाकमधील उच्चशिक्षण किंवा नोकरी ग्राह्य ठरणार नाही !

नवी देहली – भारतीय, तसेच परदेशी विद्यार्थी यांनी पाकमधील शिक्षणसंस्थांमधून शिक्षण घेतल्यास ते भारतात उच्चशिक्षण आणि नोकरी यांच्या संधींसाठी पात्र ठरणार नाहीत, असे विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) यांनी स्पष्ट केले आहे.

चीनमधील विद्यापिठांतून केवळ ‘ऑनलाइन पद्धतीने पूर्ण केलेली पदवी’ भारतात ग्राह्य धरली जाणार नसल्याचे यूजीसी आणि एआयसीटीई यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. त्यानंतर आता पाकमधील सर्वच अभ्यासक्रमांच्या संदर्भातील स्पष्टीकरण दोन्ही शैक्षणिक विषयांशी संबंधित संस्थांकडून संयुक्त परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहे.

पाकमधील स्थलांतरित नागरिकांसाठी असेल ही अट !

स्थलांतरित नागरिक आणि त्यांची मुले यांनी पाकमधील शिक्षणसंस्थेतून पदवी मिळवली असल्यास आणि त्यांना भारताकडून नागरिकत्व प्रदान केलेले असल्यास केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सुरक्षिततेच्या संदर्भातील पूर्तता केल्यानंतर ते भारतात नोकरीसाठी पात्र ठरू शकतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.